हिंगोली - संपूर्ण राज्यात राणे यांच्या वक्तव्यांचा कडाडून निषेध केला जात आहे. राणे यांना अटक होऊन जमीन मंजूर झालेला असली तरी शिवसेनिकांमध्ये मात्र संतप्त सूर उमटलेला आहे. राणेंच्या या वक्तव्याचा निषेध करत हिंगोली येथे राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा काढत त्या प्रेतावर कुत्रा बसवण्यात आला होता. तर कळमनुरी विधानसभा आमदार संतोष बांगर यांनी तर पोलीस प्रोटेक्शन हटवायला सांगत घरात घुसून कोथळा बाहेर काढण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे या धमकीची चर्चा आता संपूर्ण राज्यात होत आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भडका उडाला आहे. याचा निषेध म्हणून हिंगोली जिल्ह्यातही विविध ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करून राणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने कळमनुरी विधानसभेचे आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष बांगर यांनी थेट नारायण राणे यांना धमकी दिली आहे. केवळ पोलीस संरक्षण हटवा, मी स्वतः नारायण राणे यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या चारही मुंड्या चीत करून कोथळा बाहेर काढतो, असं वक्तव्य केले आहे. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत.
गुन्हा दाखल होण्याची शक्यता -
आमदार संतोष बांगर यांनी रागात हे वक्तव्य केल्याने आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता आहे. याप्रकरणी भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.