हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील लसीना येथील मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता होता. याबद्दलची तक्रार कळमनुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी शोध सुरू केला असता यवतमाळच्या शेंबाळपिंपरी परिसरात या मुलाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संतोष शंकर डांगे (वय १४) रा. लासीना, कळमनुरी असे या मुलाचे नाव आहे. संतोष हा कळमनुरी येथील शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत होता. तो नेहमीप्रमाणे २ दिवसांपूर्वी शाळेत आला. मात्र यानंतर घरी परतलाच नसल्याने नातेवाईकानी संतोषचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कुठेही सापडला नाही. त्यामुळे, अपहरण झाल्याची तक्रार कळमनुरी पोलिसांत दाखल केली गेली.
पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. तिसऱ्या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाळपिंपरी परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत संतोषचा मृतदेह आढळून आला. अर्धवट अवस्थेत मृतदेह जमिनीत पुरलेल्या स्थितीत असल्याने हा नरबळी असल्याचा संशयातून त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत.
घटनास्थळी खोदलेला खड्डा हा जेसीबीच्या सहाय्याने खोदलेला आहे. त्यामुळे या बालकाला संपवण्याचा कटच असावा, असा अंदाज लावला जात आहे. आता पोलिसांच्या तपासात काय उघड होते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.