हिंगोली- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात पेटला आहे. सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती देऊन मराठा आरक्षणाचे प्रकरण हे घटनापीठाकडे वर्ग करावे, या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील चार तहसील अन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बँड वाजवून सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे विविध मागण्यांचे निवेदन प्रथम आंदोलनस्थळी वाचून दाखवण्यात आले.
संपूर्ण राज्यात आता मराठा आरक्षण मुद्दा पेटत आहे, या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'बॅण्ड बजाओ आंदोलन' करून मराठा आरक्षणाकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा निर्णय झाला. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने बॅण्ड वाजवत तर, जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोरही ढोल वाजवून आरक्षणाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. मोठ्या संख्येने सकल मराठा समाज सहभागी झाला होता. कोरोनाची परिस्थिती असल्याने या ठिकाणी सामाजिक अंतर देखील ठेवण्यात आले होते. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे यासह नही देंगे तो हम छीन लेंगे, अशाही घोषणाबाजीने जिल्ह्यातील शासकीय परिसर हे दणाणून गेला.
मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे विविध मागण्याचे निवेदन हे सर्वप्रथम आंदोलनस्थळी वाचून दाखवण्यात आले. यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावून आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणतीही भरती प्रक्रिया राबवू नये, यासह विविध मागण्यांचे निवेदन हे वाचवून दाखविण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.