हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील वारंगा ते बाळापूर मार्गावर असलेल्या दाती फाटा येथे प्रेमसंबधातून एकाचा खून करून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळल्याची घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाची चक्रे गतीने फिरवून अवघ्या सहा तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. तर अपघाताचा बनाव करून पुरवा नष्ट करण्यासाठी हा प्रयत्न केला असल्याची कबुली आरोपीने दिली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
माणिकराव राजेगोरे रा. कलदगाव ता. हदगाव ह. मु. शिव रेसिडेन्सी विनायक नगर नांदेड असे मृताचे नाव आहे. आरोपी कैलास मारोतराव चिलटेवार रा. घोगरी जि. नांदेड असे आरोपीचे नाव आहे. मृताचा भीसी व जुन्या गाड्याचा खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. तर आरोपीला मृताचे आपल्या पत्नी सोबत प्रेमसंबध असल्याचा संशय होता. त्यामुळे आरोपीने काम फत्ते करण्याच्या मनोमन ठाम निर्णय घेतला आणि संधी साधून आरोपीने ४ जून रोजी बाळापूर ते वारंगा फाटा मार्गावरील दाती फाट्या जवळ खून करून मृतदेह कारमध्ये ठेवत पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
मोबाईलची करण्यात आली होती तोडफोड..
मृत राजेगोरे यांच्याकडे असलेल्या मोबाईलची तोडफोड करून तो अस्ताव्यस्त फेकून देण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच बाळापुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर हे पथकासह दाखल झाले होते. पंचनाना करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला होता.
तपासात अडचणी..
मृत राजेगोरे यांच्या मोबाइल मध्ये एक हजारच्या वर कॉन्टॅक्ट नंबर असल्याने आरोपीचा शोध लावणे पोलिसांसमोर एक प्रकारे आव्हानच होते. मात्र पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली असता, संशयित म्हणुन कैलास चिकटेवार याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन चौकशी केली. त्याने व त्याच्या एका मित्राने खून केल्याची कबुली आरोपी चिकटेवार याने दिली. अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, मृताचे आरोपीच्या पत्नी सोबत प्रेमसंबध असल्याचा संशय उघडकीस आला. त्यामुळे 3 ते 4 जून रोजी मृताचा काटा काढला. या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेऊन पुढील तपास कामी बाळापूर पोलीसांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेकडून दिली आहे.
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख, पोनि उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे पोउपनी शिवसांब घेवारे यांनी तपास केला.