हिंगोली - जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच असून नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावरील भाटेगाव शिवारात एकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास थोरात यांनी धाव घेतली. जलबा हरिभाऊ गिरबीडे (रा. हस्तरा, ता. हदगाव) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतात. गिरबीडे हे रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत आढळले. मात्र, त्यांच्याजवळ कोणतेही वाहन नव्हते. त्यामुळे ते पायी चालत असावेत, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यांचा मृतदेह डोंगरकडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आला. गिरबीडे यांच्या खिशात सापडलेल्या संपर्क क्रमांकावरून त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले.
हेही वाचा - हिंगोलीत मूकबधीर सालगडी वेदनेच्या छायेत...पोलिसांचे मात्र दुर्लक्ष
या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, कळमनुरीपासून नांदेडकडे जाणाऱ्या रस्त्यावर भयंकर खड्डे पडल्यामुळे अपघाताच्या मालिका सुरू आहेत. रस्त्यावरील मोठ-मोठाल्या खड्ड्यातून वाहने काढताना वाहनांचे इंजिनही रस्त्याला घासण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वाहनांचे काही पार्टही गळून पडल्याच्या घटना घडत आहेत. कित्येकदा खड्डेमय रस्त्यांमुळे वाहने बंद पडून नागरिकांना या रस्त्यावर मुक्काम ठोकण्याची वेळही आली आहे.
हेही वाचा - आज मी का मरत आहे ? महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राने खळबळ