हिंगोली - कोरोनासारख्या महाभयंकर संकटात पोलीस अधिकारी- कर्मचारी कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. असाच प्रकार सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथे घडला. वडिलांनी मुलाच्या विरोधात केलेल्या अर्जाच्या चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांवरच मुलाने हल्ला केला. इतकेच नाही, तर पोलिसाला जीवे मारण्याची धमकीही दिली.
रविवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामराव पोटे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे. महेश मारोती धामणे असे आरोपीचे नाव आहे. महेश आणि त्याचे वडील यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार वाद सुरू होता. सततच्या भांडणाला कंटाळून वडिलांनी नरसी पोलीस ठाण्यात मुलगा महेशविरुद्ध तक्रार दिली. त्या अनुषंगाने रविवारी रामराव पोटे व पोलीस शिपाई दराडे हे चौकशीसाठी पुसेगाव येथे दाखल झाले. त्यावेळी महेश आणि त्याच्या वडिलांचे भांडण सुरू होते. पोलिसांनी हे भांडण सोडवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आरोपी महेशने पोलिसांवरच धावून जात तुम्ही मधे आला, आता तुम्हाला मारून टाकतो, अशी धमकी दिली.
सोबतच रामराव पोटे यांची कॉलर पकडली आणि नाकावर जोरात बुक्का मारला. दराडेने आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला. तर त्यांच्याही हातावर मारत त्यांना जखमी केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर पोलीस कर्मचारी ज्या वाहनाने आले होते, त्या वाहनावर दगडफेक करत गाडीच्या काचा फोडल्या. त्यानंतर पोलिसांनी महेशला अटक केली.
दिवसेंदिवस पोलिसांवर होत असलेल्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे, खाकीचा वचक कमी झाला की काय? असा प्रश्न पडत आहे. एकीकडे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पोलीस प्रशासन कोरोनाच्या संकटातही चोख कर्तव्य बजावत आहे. तर, दुसरीकडे मात्र त्यांच्यावर हल्ले चढवून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला जात आहे.