हिंगोली - 'सोबत जग अथवा सोबत मरू' अशा प्रेमाच्या शपथा घेतलेल्या दोन प्रेमी युगलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंढा नागनाथ तालुक्यात घडली आहे. दोघांच्याही लग्नाला घरातून विरोध होता. शेवटी या दोघांनीही सोबत गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा... गावाची ओढ...पोलीस अडवतात म्हणून परप्रांतीय मजुरांचा चक्क नाल्यातून प्रवास
दोघेही भावकीतील होते. त्यामुळे दोघांचेही सोबतच कामासाठी येणे जाणे होत. दरम्यान, ते एकमेकांच्या प्रेमात पडले, अशा प्रकारच्या चर्चा गावात होत्या. मात्र, दोघे एकाच भावकीतील असल्यामुळे त्यांच्या लग्नाला दोन्ही घरच्यांनी कडाडून विरोध केला. भावकीतीलच असल्याने नेमके लग्न लावून द्यायचे कसे ? हा प्रश्न दोन्ही कुटुंबियांसमोर होता. त्यामुळे त्यांनी या दोघांची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दोघांवर त्याचा काहीही परिणाम होत नव्हता.
काल (शनिवार) रात्रीपासूनच हे दोघे गावातून बेपत्ता झाले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. त्यानंतर आज पहाटे, गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर जंगलात दोघांनीही एकाच दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेने गावासह परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.
या प्रकरणाबाबत अद्याप तरी कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. मात्र, दोघेही एकाच भावकीतील असल्याने दोघांच्या प्रेमाबद्दल सर्वजण आश्चर्य व्यक्त करीत आहेत. तसेच गावातील लोकांना अजूनही त्यांच्या प्रेमाबद्दल विश्वास बसत नाही, तशी चर्चा होत आहे.