हिंगोली- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मद्यप्रेमींची पुरती तारांबळ उडाली आहे. त्यातच देशी पिणाऱ्यांची तर विचारूच नका. अशात दारु कुठे मिळत नसल्याचे पाहून हिंगोलीत अतिवर्दळीच्या ठिकाणी असलेल्या मद्य विक्रीच्या दुकानात मद्य प्रेमींनी डल्ला मारला आहे. दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी ना इंग्लिश ना कोणत्या महागड्या दारूला हात लावला. तर, फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपयांची देशी दारुच पळवली आहे.
संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही मद्य विक्री बंद असल्याने मद्यप्रेमींची पुरती तारांबळ उडत आहे. पोलीस प्रशासन हातभट्टीवरदेखील छापा टाकत असल्याने मद्यप्रेमींची भयंकर दैना होत आहे. अशा परिस्थितीत जवाहर रोडवरील अग्रवाल मद्य विक्रीच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्याने आत प्रवेश करत चाळीस ते पन्नास हजार रुपयांची फक्त देशी दारुच लंपास केली.
मागे काही पुरावा सुटायला नको म्हणून चोरट्याने सीसीटीव्हीदेखील सोबत घेऊन पळ काढला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळातच तीन वेळा त्यांचे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे दुकान मालक संजय अग्रवाल यांनी सांगितले. आता याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.