हिंगोली - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशानुसार गुरुवारपासून हिंगोलीत अत्यावश्यक दुकानांसह मद्य विक्रीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे गुरुवारी शहरात ठिकठिकाणी दारूची दुकाने सुरू झाल्याचे पहायला मिळाले. दुकानदारांनी देखील गर्दी टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले होते. त्यातही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी गोल रिंगण आखण्यात आले होते.
एकीकडे वाईन शॉप बाहेर मंदीराबाहेर लागाव्यात तशा रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. तर, दुसरीकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होत नसल्याच्या कारणाने शेकडो वाहने पोलिसांनी जप्त केली. अचानक पोलिसांनी कारवाई सुरू केल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती.
हेही वाचा... पुणेकरांना १५ मेपासून घरपोच दारू मिळणार, पण...
हिंगोली येथे तब्बल दीड महिन्यानंतर शहरातील अत्यावश्यक दुकानांखेरीज इतर वस्तूंची दुकाने उघडली गेली आहेत. मुख्य म्हणजे गेल्या पन्नास दिवसांपासून तळीरामांचा कोरडा असलेला घसा आज ओला होत होता. मात्र, परवानगी असलेल्या विक्रेत्यांनी खरेदीदाराची थर्मल तपासणी करणे, सॅनिटायझर वापर यानंतरच ग्राहकाला दारू देण्याची परवानगी देण्यात आली होती. सकाळी दुकानांसमोर गर्दी नव्हती. मात्र, हळू हळू गर्दी वाढल्याने ग्राहकांची लांबलचक रांग लागल्याचे दिसून आले.
पोलिसांची कारवाई नागरिकांची उडाली तारांबळ...
शहरात बहुतेक नागरिक खरेदीसाठी खासगी वाहने घेऊन आले होते. त्यांची वाहने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. आय. सय्यद यांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली. जवळपास शेकडो वाहने पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली. यात इतर कामानिमित्त आलेल्या नागरिकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला.