हिंगोली- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. तसेच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनही सतर्क झाले आहे, अशा विदारक परिस्थितीत निदान नागरिकांना वेळेत आणि योग्य दराने रेशन मिळावे यासाठी प्रशासन बारकाईने लक्ष ठेऊन आहे. अशातही काळाबाजार करणाऱ्या रेशन दुकान चालकांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत जिल्ह्यातील ४ स्वस्त धान्य दुकानदारांचा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी अरुणा संगेवार यांनी ही कारवाई केली.
नामदेव टापरे (पांगरी ता. हिंगोली ), ओमप्रकाश ठमके ( आखाडा बाळापूर ता कळमनुरी), प्रकाश बन्सीलाल वर्मा (कळमनुरी), रामराव कांबळे ( रेडगाव ता. कळमनुरी) अशी निलंबन केलेल्या दुकानदारांची नावे आहेत.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात योग्य पद्धतीने रेशन लाभार्थ्यांना वाटप होते की नाही, या संदर्भात पुरवठा विभाग लक्ष ठेऊन होता. एवढेच नव्हे तर रेशन वाटप करताना तलाठ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. याच बरोबर रेशन दुकानदारांविरोधात येणाऱ्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात येत होती.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील सर्व दुकानांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, कळमनुरी तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, हिंगोली तालुक्यात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे अन वसमत तालुक्यातील प्रवीण फुलारी यांनी तक्रार प्राप्त झालेल्या रेशन दुकानदारांची चौकशी केली. यामध्ये हे दुकानदार अतिरिक्त दराने धान्य विक्री करत असल्याचे उघड झाले होते. तसेच यांच्याकडील धान्यसाठा व विक्रीचे रेकॉर्ड व्यवस्थित नव्हते. या शिवाय दुकान परिसरात कुठेही भाव फलकही लावण्यात आल्या नसल्याचे दिसून आले.
यावेळी चौकशी पथकाने ग्राहकांना धान्य खरेदी संदर्भातील पावत्या दिल्या आहेत का नाही याची ही तपासणी केली असता, लाभार्थ्यांना मशीनच्या पावत्या दिल्या जात नसल्याचे उघड झाले होते. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठविला होता. त्यामुळे पुरवठा अधिकारी संगेवार यांनी कारवाई केली आहे.