हिंगोली - पारंपरिक शेतीला बगल देत शेतकरी, कमी वेळात जास्त उत्पन देणाऱ्या पिकांना प्राधान्य देत आहेत. त्यात सर्वाधिक जास्त म्हणजे उन्हाळी पिके घेण्यावर शेतकरी भर देत आहेत. असेच एका शेतकऱ्याने उन्हाळी पीक म्हणून एकरामध्ये टरबूजाची लावगड केली आहे. पाणी, वेळोवेळी फवारणी केली. त्यामुळे भरगच्च टरबूज लगडले. लाखोंच्यावर उत्पन्न होईल, अशी अपेक्षा असतानाच एकदा विकल्यानंतर दुसऱ्या विक्रीच्या वेळेस टरबूज पिवळे पडून करपून जाण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्याच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे.
शिवचरण गिरी (रा. डिग्रस, कऱ्हाळे) असे शेतकऱ्याचे नाव आहे. गिरी यांच्याकडे वडिलोपार्जित ८ एकर शेती आहे. शेतात घेतलेल्या विहिरीला पाणी चांगल्या प्रकारे लागलेले असल्याने ते नेहमीच शेतात वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात. कधी भाजीपाला वर्गीय पिके तर कधी हळद याचे उत्पन्न घेतात. गिरी हे मागील २ वर्षांपासून टरबूजाची लावगड करत आहेत.
विहिरीला मुबलक पाणी असल्याने, त्यांनी टरबुजालाही भरपूर पाणी दिले. खताची मात्रादेखील बरोबर दिली, सोबतच फवरण्याही केल्या. त्यामुळे फळही चांगल्या प्रकारे लागले. गिरी यांच्या मागे कामाचा सर्वाधिक जास्त व्याप असल्याने, गिरी यांची पत्नीच शेती बघू लागली. दिवसेंदिवस टरबूज मोठमोठे होत होते. तसतसे हे शेतकरी कुटुंब खर्चाच्या गणिताची आकडे मोड करत होते. ज्यांचे ज्यांचे पैसे घेतले त्यांचे पैसे देऊन आपल्याला एवढा फायदा होईल. असे शेतात लगडलेल्या टरबूजाच्या फळाला पाहून स्वप्न पाहत होते. फळे जास्त लगडल्याने दोघेही मोठ्या उमेदीने काम करू लागले. गिरी यांची पत्नी स्वतःहून टरबुजाला पाणी देण्याची जबाबदारी घेत होती. पाणी देताना प्रत्येक टरबुजची निगा देखील राखत गेली. मात्र, एकदा टरबूजाची विक्री केल्यानंतर टरबूज अचानक पिवळे पडायला सुरुवात झाली. पहिल्या तोड्या मधूनही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे पहिल्या तोड्याची उणीव दुसऱ्या तोड्यामधुन निघण्याची अपेक्षा शेतकरी गिरी यांना होती. मात्र, हिरवेगार दिसणारे टरबूज पिवळे होऊन करपून जाऊ लागले. त्यामुळे गिरी हे कासावीस झाले. त्यानी अनेकदा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याशी संपर्क साधला मात्र तिकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. लावगड केली तेव्हाच दोन वेळा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या होत्या.
टरबुजाच्या पिकामधून भरघोस उत्पन्नाची अपेक्षा होती, त्यातून उत्पन्न न मिळाल्याने गिरी यांच्यावर संकट कोसळले आहे. ज्या टरबुजला डोळ्यासमोर लहानच मोठे होताना पाहिले, त्याला वेलापासून दूर करून फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
आता शेतात आहेत ती टरबूजे हातची जाऊ नयेत म्हणून, हिंगोली येथील बागावांनाशी संपर्क साधून टरबूज विक्री केली. तर बागवानानेही या संधीचा फायदा घेत १० ते १२ रुपये किलोप्रमाणे खरेदी केली जाणारी टरबूजे केवळ ३ ते ४ रुपये प्रती नगाने खरेदी केली. टरबूज मातीमोल किंमतीने विकल्याचे दुःख मनात बाळगून गिरी यांनी मिळेल ती किंमत स्वीकारली. टरबूज विकून लाखात येणारा पैसा केवळ हजारात आल्याने यातून भांडवली खर्चही निघणार नसल्याची खंत गिरी यांनी व्यक्त केली.