हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर आज दोन महिन्यांनंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या आदेशाने हिंगोलीत सराफा दुकाने उघडली आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी ग्राहक नसल्याने शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत हातात हात ठेऊन ग्राहकांची प्रतीक्षा करत बसण्याशिवाय दुकानदारांना पर्यायच नव्हता. एक दोन वगळता जास्त ग्राहकच नसल्याची खंत सराफा व्यवसायिक व्यक्त करत आहेत.
कोरोनाने सर्व अर्थचक्रच बदलवून टाकले आहे. त्यातच संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढत्या आकड्यामुळे धडकी भरत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ही चिंता राज्य राखीव दलाचे जवान निगेटिव्ह आल्याने कमी कमी होऊ लागली. मात्र मुंबई रिटनने पुन्हा हिंगोलीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शांत झालेले प्रशासन पुन्हा त्याच गतीने कामाला लागले आहे.
गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने सर्वच आस्थापने बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हळूहळू अत्यावश्यक सेवा सुरू केली अन् आज दोन महिन्यांनंतर ज्वेलरीचे दुकान नियमाच्या अधीन राहून 8 ते 1 या वेळेत उघडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सराफा व्यवसायिकांनी दुकाने उघडली आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी तेवढा ग्राहकांचा प्रतिसाद दिसून आला नाही. एरवी हा कालावधी म्हणजे सोने चांदी व्यापाऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा असतो. या दिवसात विवाह शुभारंभ असल्याने, सोने चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी असते, शिवाय, खरिपाची पेरणी करण्यासाठी देखील सोने चांदीची उलाढाल होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक गणितच बिघडले आहे. आज जरी ज्वेलरीचे दुकान उघडले असले तरी कोरोनामुळे विवाह समारंभ रद्द असल्याने, पाहिजे तेवढा प्रतिसाद राहणार नसल्याची खंत व्यावसायिक व्यक्त करत आहेत. मात्र खरोखरच ज्यांना खरच सोन्याचांदीची गरज होती, त्यांच्यासाठी आजचा दिवस हा आनंदाचाच दिवस म्हणावा लागेल.