हिंगोली - विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध क्रीडा प्रकार अत्यंत महत्वाचे आहेत. खेळामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होतोच त्याच बरोबर त्यांचा बौद्धिक विकासही होण्यास मदत होत असल्याचे मत जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून तीन दिवस क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - संघ जिंकला तरीही, स्मिथने स्वत:लाच दिली 'अनोखी' शिक्षा
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी यांच्या विद्यमाने अमरावती विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या तीन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदान येथे करण्यात आले होते. आदिवासी विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता चांगली असते. यामुळे खिलाडूवृत्तीने उत्कृष्ट प्रदर्शन करण्याची त्यांची क्षमता ही वाखाणण्यासारखी असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन करण्याची शपथ घेतली. तसेच प्रमुख अतिथींना सहभागी खेळाडूंनी मानवंदना दिली. यावेळी कळमनुरी आणि पुसद यांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेने या विभागीय क्रिडा स्पर्धेची सुरुवात झाली. अमरावती विभागाच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील यांनी मार्गदर्शन करताना आदिवासी विद्यार्थ्यांनी सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील क्रीडा कुशलतेचा उपयोग करुन घ्यावा. क्रीडा स्पर्धामुळे विद्यार्थी जीवनातील यशापयशाला तोंड देण्यास सक्षम होतात. खेळाडूंना आपली क्षमता दाखविण्याचे तसेच खिलाडूवृत्ती निर्माण करुन पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत चांगली कामगिरी करण्याचे आवाहन केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची ,भोजन, वैद्यकीय, सुरक्षा इत्यादी सर्वप्रकारच्या सुविधांची चोख व्यवस्था ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी आयोजकांना दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, अमरावती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे समादेशक मंचक इप्पर, अकोला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक (प्रशिक्षण) प्रशांत वाघुंडे, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, जिल्हा क्रीडा अधिकारी कलीम फारुकी, माजी सहायक प्रकल्प अधिकारी शंकर राठोड आणि आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प संचालक विशाल राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.
आदिवासी विभाग अमरावती अंतर्गत येणाऱ्या कळमनुरी, किनवट, पांढरकवडा, अकोला, औरंगाबाद, पुसद आणि धारणी अंतर्गत शासकीय व अनुदानीत आश्रमशाळांच्या शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.