हिंगोली - संशयाच्या वादातून चक्क पतीने पत्नीला संपवण्यासाठी ब्लेडने तिच्यावर वार करत गळा चिरल्याची घटना 17 मार्च रोजी सायंकाळी घडली. वसमत तालुक्यातील कानोसा येथे ही घटना उघडकीस आली आहे. जखमी पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - 'क्रीम पोस्टिंग'साठी आयपीएस अधिकारी घेतात एजंटांची मदत -आयपीएस रश्मी शुक्ला
शोभा ज्ञानेश्वर गोरे असं जखमी महिलेचे नाव आहे. तर ज्ञानेश्वर आनंदा गोरे (रा. भुरक्याची वाडी ता. कळमनुरी) असे आरोपी पतीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून वाद होत असे. पती हा शोभाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असे. त्यामुळे पतीच्या या त्रासाला कंटाळून शोभा ही आपल्या मुलांसह आई-वडिलांकडे राहण्यासाठी गेली होती. परंतु काही दिवसाने ज्ञानेश्वर यांनी काही गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सोबत घेऊन सासरवाडीत धाव घेतली. येथून पुढे अजिबात तुझ्यावर संशय घेणार नाही, असे सर्वांसमक्ष सांगितले अन् परत आपल्या घरी आणले होते. पत्नीसोबत पती काही दिवस चांगला राहिला. मात्र त्याच्या वागण्यात अजिबात बदल झालेला नव्हता.
जीवे मारण्याच्या उद्देशाने उशाला घेऊन झोपत होता विळा
पती ज्ञानेश्वर हा गेल्या अनेक दिवसापासून पत्नीला संपविण्याचा कट करत होता. एवढेच नव्हे तर तो वारंवार पत्नी शोभाला तसेच सांगत देखील होता. त्यामुळे शोभाच्या मनामध्ये कायम भीती निर्माण झाली होती. ज्ञानेश्वर नेहमीच झोपताना उशाला विळा घेऊन झोपत असे. हळद काढणीच्या कामासाठी गेलेली शोभा नेहमीप्रमाणे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास प्रांत विधीसाठी गेले असता, ज्ञानेश्वर तिच्या पाठीमागे गेला अन् शोभाचे केस पकडून तिच्या गळ्यावर थेट ब्लेडने वार करण्यास सुरुवात केली. शोभा यांनी आरडाओरड केल्यानंतर शेतात कामानिमित्त असलेल्यांनी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला सोडून पतीचे पलायन
घटनास्थळी ग्रामस्थानी धाव घेतल्यानंतर पतीने तेथून पळ काढला, जखमी शोभाला ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात हलवले आहे. तर शोभा यांच्या गळ्याला जास्त मार असल्याने, प्रकृती फार चिंताजनक आहे. या प्रकरणी कुरुंदा पोलीस ठाण्यात 22 मार्च रोजी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. तपास सपोनि सुनील गोपीनवार हे करीत आहेत.
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : एटीएसने दमणमधून ताब्यात घेतली व्होल्वो कार