हिंगोली - प्रेम हे नादान असते... प्रेमात कशाचेच भान नसते.. ना वयाचे.. ना लोक काय बोलतील याचे. म्हणतात ना, प्रेम हे आंधळे असते. अशाच आंधळ्या प्रेमाचा खरा-खुरा अनुभव हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील पार्वतीनगरमध्ये आलाय. ही प्रेमकहाणी ऐकल्यावर तुम्हीही थक्क व्हाल....
सेनगाव येथील पार्वती नगरमध्ये येथे भाडेकरू म्हणून राहत असलेल्या 17 वर्षीय युवकाच्या प्रेमात चक्क 36 वर्षीय घर मालकीण पडलीय. तिने त्या 17 वर्षीय युवकासोबत पोबारा देखील केलाय. एखाद्या चित्रपटात शोभेल तशीच कहाणी येथे घडल्याने जोरदार चर्चा होत आहे. या प्रकरणी मुलाच्या वडीलाने दिलेल्या फिर्यादीवरून घरमालकीणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
भाडेकरु हे मूळचे हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथील रहिवासी आहेत. ते कामानिमित्त सेनगाव येथे राहत असल्याने ते तेथेच आपल्या कुटुंबासह भाड्याने राहतात. घरमालकिण यांच्या पतीचे निधन झाले आहे. दरम्यान 12 जुलैला दुपारी साडेबारा वाजता तिने 17 वर्षीय मुलासोबत पोबारा केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर पोबारा केलेल्या घरमालकिनीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
घरमालकिण घरातून गायब झाल्यापासून ही दोन चिमुरडे आपल्या आईची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहेत. मात्र, एखाद्या चित्रपटांमध्ये शोभावी अशीच घटना सेनगाव येथे घडल्यामुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मात्र, नेमका खरा प्रकार आहे तरी काय? हा पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे. सध्यातरी काकू आणि हा 17 वर्षीय युवक गायब झाल्यामुळे वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत.