हिंगोली - सुशिक्षित बेरोजगार मुलांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या वसमत शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड, मुंबई, लखनऊ येथून आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल नऊ राज्यातील मुलांची या टोळी फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या कारवाईमुळे हिंगोली पोलिसांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रवींद्र उर्फ राबीद्र दयानिधी संकुवा (वय ४६ वर्षे रा. ओडीसा, ह. मू काटेमान्नीवली जि. ठाणे), अॅड. नरेंद्र विष्णदेव प्रसाद (वय ५५ वर्षे, रा. लयरोपरुवार जि. मऊ उत्तरप्रदेश,) सतीश तुळशीराम हंकारे (रा. बोरगाव जि. नांदेड, ह. मु. अहमदपूर व नांदेड), आनंद पांडुरंग कांबळे (वय २४ वर्षे, रा. अहमदपूर, जि. लातूर), गौतम एकनाथ फणसे (वय ५६ वर्षे, रा. वाघनी, जि. ठाणे), अभय मेघशाम रेडकर उर्फ राने (वय ४८, रा. शिरोडा जि. सिंधुदुर्ग), मुख्य आरोपी संतोष कुमार सरोज ( वय २९ वर्षे, रा. बोडेपूर, जि. जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी या टोळीतील आरोपीची नावे आहेत.
आरोपीने अति बारकाईने केलीय सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक
या टोळीतील आरोपी हे एका ठिकाणचे नसून विविध राज्यातील आहेत त्यांनी एकेक करत सुशिक्षित बेरोजगार मुलांची फसवणूक केली आहे. यातील मुख्य आरोपी हा संतोष कुमार सरोज असून त्याच्याकडे मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांचे बनावट स्टॅम्प तसेच भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार नाव असलेले रेल्वे अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी लागणारे कागद, लपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र व अनेक मुलांचे बनावट नियुक्ती पत्र आढळून आले आहेत. तसेच अनेक एटीएम कार्ड, मोबाईल व सदरील आरोपीच्या खात्यावर करण्यात आलेला आतापर्यंतचा व्यवहाराचे बँक डिटेल पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
आरोपींनी वापरलेली विविध 18 बँक खाती गोठवण्यात आली
ही टोळी राष्ट्रीय पातळीवरील असून या टोळीतील आरोपीने वापरलेले विविध बँकेतील १८ बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तर आरोपीच्या खात्यातील ११ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. ५६ हजार रुपये रोख व ८ लाख रूपये किमतीची एक चारचाकी मोटार आणि ५० हजार रुपये किमतीचे सात मोबाईल ,असा वीस लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भारतभर आहे गुन्ह्याची व्याप्ती
या प्रकरणांमध्ये गुन्ह्याची व्याप्ती ही संपूर्ण भारतभर असल्यामुळे अनेक आरोपी अजूनही अटक होण्याची शक्यता आहे. या टोळीने ही गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्र, ओडीसा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्ली, पश्चिम बंगाल यासह इतरही अनेक राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक केली आहे. त्यामुळे यामध्ये अजूनही अनेक मासे गळाला लागण्याची शक्यता हिंगोली पोलिसांनी वर्तवली आहे.
फसवणूक झालेल्यांनी वसमत पोलिसात संपर्क साधण्याचे केले आवाहन
या प्रकरणातील आरोपी हे विविध राज्यात आहेत. तसेच या गुन्ह्याची व्याप्ती ही पूर्ण भारतभर असल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार मुलांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या राज्यातील मुलाची या आरोपीकडून फसवणूक झाली आहे. अशांनी वसमत शहर किंवा स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक आणि केले कौतुक
या कारवाईही विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी तसेच पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनी उदय खंडेराय, वसमत शहरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक पंढरीनाथ बोधनापोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, वामन पवार, निलेश हलगे, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण, संदीप चव्हाण, रवी ठेंबरे, विवेक गुंडरे, बालाजी वडगावे यांनी केली आहे. या कारवाईचे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा - पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा एटीएम फोडण्याचा डाव फसला