हिंगोली - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्राची स्थापना केली. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा आधार झाला आहे. विशेष म्हणजे एकाच छताखाली विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षेची पुस्तके मोफत उपलब्ध झाली आहेत.
हिंगोली नगरपालिकेने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक राज्य पातळीवरील पारितोषिके मिळवली आहेत. तर 2020 देखील स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी देखील आता पासूनच सुरू आहे. याच पालिकेने हिंगोली शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत कायापालट करत चेहरामोहराच बदलून टाकला. मात्र ही पालिका आता भविष्यात अधिकारी होणाऱ्या मुलांसाठी देखील आधार बनली आहे. वर्षभरापूर्वी हिंगोली शहरात उभारलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रामुळे विद्यार्थ्यांची पायपीट थांबण्यास मदत झाली. हिंगोली येथे असलेल्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्रात जवळपास पाचही तालुक्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दाखल झाले. या केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची विविध पुस्तके पालिकेने उपलब्ध करून दिली आहेत.
विशेष म्हणजे या अभ्यासिका केंद्रात विद्यार्थिनींकडून कोणत्याही प्रकारची फी आकारली जात नसून विद्यार्थ्यांकडून फक्त प्रवेश फी म्हणून 100 रुपये आकारले जतात. एकाच वेळी 500 च्या वर विद्यार्थी व विद्यार्थिनी अभ्यास करू शकतात, इतकी मोठी ही अभ्यासिका नगराध्यक्ष बाबाराव बांगर व मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या संकल्पनेतून उभारली आहे. पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कधी शेतातील झाडांचा तर कधी खासगी अभ्यासिकाचा शोध घेत भटकंती करत होते. मात्र वर्षभरापासून भावी अधिकाऱ्यांची ही पायपीट थांबली आहे. हिंगोली शहरातील बहुतांश विद्यार्थी तर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या ख्रिश्चन समाजाच्या स्मशानभूमीत असलेल्या झाडांचा आधार घेत अभ्यास करत होते. आता मात्र ही वेळ टळली आहे.
विविध विभागातील अधिकारी या अभ्यासिका केंद्रातील विद्यार्थ्यांना अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. वेळेचे महत्व, कोणकोणती पुस्तके हाताळावीत, आदी संदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेष म्हणजे पालिकेने राबविलेल्या या उपक्रमाचे विद्यार्थिनींच्या वतीने आभार मानले जात आहेत. या उपक्रमामुळे निश्चितच स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निदान वर्षाला ८ ते १० विद्यार्थी अधिकारी जरी झाले, तरी नगर पालिकेने राबविलेल्या उपक्रमाचे सार्थक होईल. हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे अभ्यासिका केंद्र चालविण्यात येत असल्याचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर आणि मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना सांगितले. या वरूनच पालिका खरोखर जनतेच्या हिताचे कार्य करत असल्याचे दिसून येत आहे.