हिंगोली - लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल हा खरोखरच ऐतिहासिक ठरला आहे. या निकालांमध्ये महायुतीचे हेमंत पाटील हे शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर होते. त्यामुळे शेवटपर्यंत लीडवर असणारे हेमंत पाटील हे पहिलेच उमेदवार ठरले आहेत. निकालाच्या आकडेवारीतून निश्चितच हिंगोली लोकसभेतील मतदारांना नवीन चेहऱ्याची अपेक्षा होती. हेच या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या निकालाचा विधानसभा निवडणुकांवर परिणाम होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघाचा लोकसभेचा निवडणूक निकाल 23 मे रोजी जाहीर झाला. या निकालांमध्ये सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार हेमंत पाटील हे सर्वाधिक जास्त मताधिक्क्याने आघाडीवर होते. त्यांचे हिंगोलीमध्ये कोणतीही बॅक फुट नसले तरीही ते सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झाल्यामुळे त्यांच्या आकडेवारीवर पराभूत झालेल्या उमेदवारांनी शंका उपस्थित केली आहे. मात्र, हिंगोलीकरांना खरोखरच नवा चेहरा अपेक्षित होता हेच या मतपेटीतून स्पष्ट दिसून आले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीलाच वंचित फॅक्टर चालल्यास निश्चितच या निवडणुकीमध्ये महायुतीवर परिणाम होईल? असे जाणवत होते. मात्र, निकालानंतर चित्रच बदलून गेले. तर काँगेसचे राजीव सातव यांच्या अगोदर सेनेकडून हिंगोली खासदारकीची धुरा सांभाळणारे सुभाष वानखेडे यांनी हिंगोली जिल्ह्याचा विकास तर सोडाच मात्र त्यांनी या जिल्ह्याकडे साधे फिरकूनही पाहिले नव्हते. यातच ऐन निवडणुकीत भाजपकडून झेप घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले सुभाष वानखेडे यांना त्यांच्या स्वतःच्या हातगाव मतदारसंघातही मते मिळविता आली नाहीत. तसेच काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आल्याने त्यांचा हवा तसा या निवडणुकीत प्रचार झाला नाही.
महायुतीचे हेमंत पाटील हे हिंगोलीत तळ ठोकून होते. त्यांच्या पत्नीने देखील अगोदरच हिंगोली जिल्ह्यातील बरीचशी गावे पिंजून काढली होती. तर हेमंत पाटील यांनी प्रचारादरम्यान गावोगाव घेतलेल्या कॉर्नर सभेत मतदारांना आश्वासने दाखवून दिली होती, त्यात आश्वासनावर विश्वास ठेवत मतदारांनी हेमंत पाटील यांना कौल दिल्याचे चित्र दिसून आले.
विशेष म्हणजे हेमंत पाटील यांना सुभाष वानखेडे यांच्या मतदारसंघात दुपटीने लीड होती. ती लिड शेवटच्या फेरीपर्यंत कायमच होती. उमरखेड, किनवट, हदगाव, कळमनुरी, हिंगोली या पाचही मतदारसंघांमध्ये वानखेडे यांना कुठेही लीड मिळालेली नाही. तर वंचितचे मोहन राठोड हे पाचही मतदारसंघातील मतदारापर्यंत पोहोचू शकले नाहीत. तरीदेखील मतदाराने बाळासाहेब आंबेडकर या नावावरच राठोड यांना मतदान केले. त्यामुळे वंचिताच्या मतदानाचा महायुतीच्या उमेदवारावर काहीही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट दिसून आले.