हिंगोली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी पासून सुरू झालेली यात्रा हिंगोली 11 नोव्हेंबर रोजी दाखल होणार आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस सुरक्षा दर्जा ( Z Plus security rating ) असल्याने, सुरक्षेच्या दृष्टीने 14 ते 15 नोव्हेंबर पर्यंत हिंगोली वाशिम हा राष्ट्रीय महामार्ग ( Hingoli Washim National Highway ) वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली आहे.
यात्रा हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस मुकामी : काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 11 नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यादृष्टीने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तर यात्रेच्या स्वागताची तयारी जोमात केली असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन देखील पूर्णपणे सज्ज झाले आहे. यात्रा हिंगोली जिल्ह्यात तीन दिवस मुकामी राहणार असून, राहुल गांधी यांच्या मुकामाच्या ठिकाणी व विश्रांतीच्या ठिकाणी मोठी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या महामार्गाने ही यात्रा जाणार आहे. त्या रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेऊन, या महामार्गाने वाहतूक न करता पर्यायी रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन हिंगोली पोलीस प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
नोटीस बोर्डवर आदेश लावून ग्रामस्थांना कळवण्याचे आवाहन : तसेच याच मार्गावरील कनेरगाव नाका, कानरखेडा, आडगाव मुटकुळे, आंबाळा, फळेगाव या गावातील पोलीस पाटलांनी देखील आपआपल्या गावात दवंडी देऊन व विविध वाटसप ग्रुपवर माहिती देऊन, ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर आदेश लावून ग्रामस्थांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.