हिंगोली - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मद्य विक्रीची बंद असलेली दुकाने आता सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मद्य विक्रेत्यांनी दुकानाबाहेर उभे राहणाऱ्या मद्यपींसाठी बॅरिकेट तयार केले आहेत. तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची देखील तयारी केली आहे. एवढी जोमात तयारी केलेली असली तरीही खरोखरच मद्यपी भानावर राहतील की नाही? याची सर्वांनाच चिंता लागली आहे.
हिंगोली जिल्ह्यात तब्बल 50 दिवसांनंतर मद्य विक्रीची दुकाने बुधवारी सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मद्यपींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 50 दिवसांची पोकळी भरून काढण्यासाठी अनेकजण चांगलेच आतुरलेले असण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मद्य विक्रेत्यांनी चांगलीच तयारी केली आहे. एवढेच नव्हे तर शासनाने देखील काही नियमाच्या अधीन राहून मद्य विक्री करण्याचे आदेश दिले असून आज दिवसभर शासनाच्या सूचनांचे पालन करीत दुकानदारांनी तयारी केली आहे. मुख्य म्हणजे मद्यपींच्या गर्दीचा अंदाज घेत, दुकानाबाहेर बॅरिकेट तयार केले आहेत.
अनेक मद्यप्रेमींना आस लागली असली तरी, परवाना असलेल्यांनाच रांगेत लागता येणार आहे. जवान किंवा सहायक दुय्यम निरीक्षक यांनी सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, म्हणून बंदोबस्त देखील ठेवणे गरजेचे राहणार आहे. मुख्य म्हणजे दुकानासमोर पाचपेक्षा जास्त ग्राहक थांबायला नकोत, शिवाय दोन ग्राहकांमध्ये 6 फूट अंतर असणेही आवश्यक आहे. तसेच सर्दी, खोकला असणाऱ्याला दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये आणि नोकरांची व ग्राहकांची थर्मल तपासणीही करणे तेवढेच गरजेचे आहे. दर दोन तासांनी परिसर निर्जंतूक करणे गरजेचा आहे.
अजून एक विशेष बाब म्हणजे मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 च्या नियम 70 डी नुसार विहीत केलेले मद्य बाळगणे, खरेदी करणे गरजेचे आहेत. देशी दारू दुकानाची सकाळी 8 ते दुपारी 1, विदेशी 10 ते 1, देशी अन् विदेशी ठोक विक्री 10 ते 5 अशी वेळ निर्धारित केली आहे. एकंदरीतच मोठ्या प्रमाणात शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन किती मद्य विक्रेते मद्य विक्री करतात याकडे लक्ष राहील.
हिंगोली जिल्ह्यात एकूण देशी दारूची 42 दुकाने असून यापैकी 41 दुकाने सुरू राहणार आहेत. तर चार वाईनशॉप पैकी 3 वाईन शॉप सुरू राहणार आहेत.
अशी आहे परवानाधारक मद्यपींची संख्या
हिंगोली जिल्ह्यात एका दिवसासाठी दारू पिण्याचा परवाना असणाऱ्यांची संख्या 20 हजारावर आहे. वर्षभर दारू पिण्यासाठी परवाना असणाऱ्यांची संख्या 3 हजारावर तर कायमस्वरूपी दारू पिणाऱ्यांची संख्या दीड हजारावर गेलेली आहे.