हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील वीर जवानांच्या आईची लॉकडाऊनमुळे फार वाईट परिस्थिती झाली आहे. शिवाय घरात काहीच नसल्याने केवळ भात खाऊन आजीबाई दिवस ढकलत होत्या. ही बाब प्रशासनास कळताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी स्वतःहून वीरमातेची भेट घेऊन अन्नधान्य आणि रोख पाच हजार रुपयांची मदत केली. आयुक्त देखील आर्थिक मदत करणार असल्याने मातेचे बँकेत खाते उघडण्यासाठी यंत्रणेला सूचना देणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
लॉकडाऊनमुळे हुतात्मा जवानाच्या मातेवर उपासमारीची वेळ, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः भेट घेऊन केली मदत रुखमाबाई परसराम भालेराव, असे या वीरमातेचे नाव आहे. वीरमाता रुखमाबाई या आपल्या एका नातीसह औंढा नागनाथ येथील पिंपळदरी येथे राहतात. त्यांना कविचंद परसराम भालेराव, प्रकाश परसराम भालेराव ही दोन मुले असून कवीचंद हा मुलगा सैन्यात होता, तर दुसरा प्रकाश रोजमजुरी करून संसाराचा गाडा हाकतोय. सैन्यात असलेल्या मुलाला 6 जुलै 2002 ला वीरमरण आले, तर बाहेरगावी कामानिमित्त गेलेला दुसरा मुलगा हा कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे अडकला आहे. वीरमरण आलेल्या मुलाची शासनाकडून आर्थिक मदत मिळाली होती. मात्र, वीरमाता आणि वीरमरण आलेल्या जवानाच्या पत्नीमध्ये वाद झाला. त्यामुळे ती माहेरी निघून गेली. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. अनेकदा चकरा मारल्यानंतर काही प्रमाणात रक्कम पदरात पडली, तर उर्वरित रक्कम ही पत्नीला मिळाली. तिने दुसरे लग्न करून संसार थाटला. वीरमाता रुखमाबाई दुसऱ्या मुलाजवळ राहतात. मात्र, घरी गुंठाभरही जमीन नसल्याने, प्रकाशने आपल्या पत्नीसह कामानिमित्त बाहेर गावी धाव घेतलीय. इकडे वीरमाता आपल्या नातीसह गावात राहतात. वीरमरण आलेल्या आपल्या मुलाचे छायाचित्र हाती घेऊन ही माता जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात धडपडत आहे. त्यांना अजून कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही.मुलगा बाहेरगावी अडकला असल्याने लॉकडाऊनच्या काळात वीरमातेची मोठी फरफरट होत आहे. वय जास्त झाल्याने काही काम करता येत नाही. शिवाय आता दृष्टीही कमी झालेली आहे. ही सर्व धक्कादायक बाब समाजसेवक बापूराव घोंगडे यांनी विविध माध्यमाद्वारे प्रशासनाच्या लक्षात आणून देताच, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, तहसीलदार पी. एम. माचेवाड यांनी पिंपळदरी येथे धाव घेऊन वीरमातेला अन्नधान्य व रोख पाच हजार रुपयांची मदत दिली. आयुक्त सुनील केंद्रेकर आर्थिक मदत करणार असल्याने वीर मातेचे बँकेत खाते उघडणार असल्याचे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. वीरमातेसाठी संपूर्ण प्रशासन धावून आल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले.