हिंगोली - कोरोनाचा सामना करण्यासाठी आमची यंत्रणा पूर्णपणे सक्षम असल्याचे हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी म्हटले आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जयवंशी यांनी हिंगोलीकरांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नागरिकांना स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन केले. सोबतच काही शंका असल्यास ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क साधून वैद्यकीय तपासणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यामध्ये हिंगोली जिल्हादेखील अडकलेला आहे. मात्र, या संकटाला कोणीही घाबरू नका. कारण आमची प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा ही पूर्णपणे सक्षम असून आज घडीला सतर्कदेखील आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
पुढे ते म्हणाले, काळजी घेतल्यास निश्चितच आपण या महामारीचा सामना करु. सोबतच कोणालाही सर्दी, पडसे जाणवले तर त्यांनी ताबडतोब आरोग्य विभागाशी संपर्क साधावा किंवा जे टोल फ्री क्रमांक दिले आहेत त्यावर संपर्क साधावा. आमची यंत्रणा तुमच्याजवळ काही वेळामध्ये पोहोचून तुम्हाला उपचार देण्यासाठी मदत करेल, असे त्यांनी सांगितले.
स्वतःच्या जीवाची जराही पर्वा न करता डॉक्टर परिचारिका पोलीस प्रशासन हे आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे, अजिबात घाबरू नका. कोरोनाला आपण सर्वांनी मिळून हरवायचे आहे. तुम्ही जर तुमची काळजी घेत राहिलात तर निश्चितच कोरोनावर मत करु, असे जयवंशी म्हणाले.