हिंगोली - मुंबई रिटर्न्समुळे आता कोरोनाने ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. मुंबई, पुणे येथून परतलेल्यांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आढळत असल्याने, ग्रामीण भागाची चिंता वाढली आहे. शनिवारी एकाच दिवशी 50 रुग्ण आढळल्यानंतर पुन्हा रविवारी रात्री साडे अकरा वाजता अजून 9 जणांचे अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. कमी कमी होणारा आकडा आता परत 69 जाऊन पोहोचला आहे. अजूनही 183 जणांचे अहवाल येणे बाकी आहेत.
हिंगोली जिल्ह्यात राज्य राखीव दलाच्या जवानांमुळे कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला होता. मात्र आरोग्य विभागाच्या यशस्वी उपचारामुळे हा आकडा कमी कमी होऊन आता केवळ एकच जवान औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला होता. मात्र आता मुंबई रिटर्न्समुळे पुन्हा कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ होत चालली आहे. त्यामुळे हिंगोलीकरांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच दिवशी ५० कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर परत नऊ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वसमत, सेनगाव, हिंगोली अन औंढा नागनाथ पाठोपाठ आता कळमनुरी तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला आहे. एकट्या कळमनुरी तालुक्यातील 8 जणांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये चार मुंबई, रायगड वरून 3 अन पुणे येथून आलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. त्यानुसार आकडा आता 69 वर पोहोचला असून, जिल्ह्यात 169 दीड शतक पेक्षा जास्त वाढ झालीय. यातील 90 बरे झाले असून त्याना सुट्टी देखील दिली आहे. मात्र ऐन पेरणीच्या काळात हा कोरोना ग्रामीण भागात पोहोचत असल्याने, गावेच्या गावे सील केली जात आहेत. त्यामुळे पेरणीचे नियोजन कोलमडण्याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. लॉकडाऊनमधून सावरत कशीबशी शेताच्या मशागतीला वेग आला होता. त्यामुळे आता त्याला ब्रेक लागला आहे.