हिंगोली - कोरोनामुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून सर्वसामान्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेवून ग्राहकांची लूट करणाऱ्यांची सख्या कमी नाही. मात्र, नगरपालिका अशांवर लक्ष ठेवून आहे. आज जीवनावश्यक वस्तूंचे दरपत्रक न लावणाऱ्यांवर आणि मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंड आकारण्यात आला आहे. इतके करूनही नागरिक सुधरणार नसेल तर गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी दिला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातही एकदम सहा रुग्ण कोरोना बाधित आढळल्याने प्रशासन सतर्क झाले आहेत. शहरातील मुख्यरस्ते वगळून सर्वच लहान रस्ते सील केले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नगरपालिकेच्या वतीने जीवनावश्यक वस्तू विक्री करणाऱ्या दुकानावर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. वस्तूचे ज्यादा दराने भाव आकारणाऱ्या दुकानदारांची चौकशी करून 6 दुकानदारांना प्रत्येकी 5 हजार प्रमाणे दंड आकारला आहे. वस्तूवर आणि बाहेर दरपत्रक लावणे बंधनकारक केले आहे. तसेच सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांना देखील 37 जणांना प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दर आकारला आहे. नागरिकांनी अजूनही सोशल डिस्टन्सिंग गंभीरतेने न घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रत्येकी 200 रुपये प्रमाणे 38 जणांना दंड आकारला आहे, तर एका नागरिकाला सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे 1 हजार रुपयांचा दंड आकारला आहे. असा एकूण 57 हजार 200 रुपये दंड नगरपालिकेने वसूल केला आहे. मात्र, ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी नगरपालिकेने उचललेले हे पाऊल अतिशय लाभदायी ठरत आहे. एवढेच नव्हे तर हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांसाठी नगरपालिका खरोखरच धावून जात असल्याचे दिसून येत आहे.
हिंगोली शहरात जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या आदेशाने आकारलेला दंड -
- सार्वजनिक स्थळी थुंकणे - रु 1000
- सार्वजनिक स्थळी तोंडावर मास्क न लावणे - 500 रुपये
- सार्वजनिक स्थळी विनाकारण फिरणे - 1000 रुपये
- एखादी व्यक्ती दुचाकीवरून भाजी, किराणा, औषधे आणण्याची खोटी बतावणी करणे - 500 रुपये
- दुकानदार आणि भाजी विक्रेते यांनी ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स पाळले नाही तर ग्राहकाला - 200 रुपये आणि दुकानदाराला - 2000 रुपये दंड
दरम्यान, वरील सर्व प्रकार दुसऱ्यांदा आढळल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देखील पालिकेने दिला आहे.