हिंगोली - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा धोका वाढत असून हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पाठोपाठ जिल्हाधिकारी यांचा देखील अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सध्या, जिल्हाधिकारी हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचारासाठी दाखल झालेले आहेत. तर, सोबतच महसूल प्रशासनामध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे
हिंगोली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चाललेली आहे. कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासन अहोरात्र अथक परिश्रम घेत आहे. परंतु आता, कोरोनाचे रुग्ण हे शासकीय कार्यालयात आढळून येत असल्यामुळे कार्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ही चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशाच विदारक परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा अहवालही आज हिंगोली प्रशासनाला प्राप्त झाला असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सध्या जिल्हाधिकारी हे जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत निर्जंतुकीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य विभागाच्या वतीने स्वॅब नमुने घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आता अजून कोरोनाबाधितांची संख्या वाढते की काय, अशी चिंता भेडसावत आहे. दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी हे विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना वार्ड व अलगीकरण कक्षाला वारंवार भेटी देत होते. अन् आज त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आलेला आहे. मात्र, जनतेने अजिबात घाबरून जाण्याचे काही कारण नाही. गुरुवारपासून लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पाळावा. आता हा लॉकडाऊन शेवटचा राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.