हिंगोली - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. हिंगोली-कळमनुरी मार्गावरील सावरखेडा गावाजवळ, रस्त्यावरील खड्डे चुकवताना हमखास अपघात घडत आहेत. आजपर्यंत याठिकाणी तीन ते चार जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे शनिवारीही झालेल्या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर पाच गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
रामेश्वर कानबाराव काईट (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर, अशोक भिकाजी नवघरे, अविनाश अशोक नवघरे, जेता बाळू राठोड, रुक्मिणी जेता राठोड, लीना मनोज राठोड हे सर्व गंभीर जखमी झाले आहेत.
हिंगोली-कळमनुरी राज्य महामार्गावर, लासीना फाटा येथून जवळच असलेल्या सावरखेडा येथे ट्रक-दुचाकी आणि ऑटोचा विचित्र अपघात झाला. हा अपघात एवढा भयंकर होता की, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले.
पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. यामध्ये ऑटो रस्त्याच्या 30 फूट बाजूला जाऊन पडली, तर दुचाकीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघाताची माहिती बासंबा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृत व जखमींना हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. घटनेचा पंचनामा झाला असून, अजूनपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र, सावरखेडा ते लासिना या गावापर्यंत रस्त्यावर भयंकर असे खड्डे पडल्यामुळे अपघातांचे सत्र सुरूच आहे. काही महिन्यांपूर्वी येथेच एका महिलेचा अपघाती मृत्यू झाला होता.
अपघातग्रस्त वाहनाच्या पाठीमागेच माजी खासदार शिवाजी माने यांचे वाहन येत होते. घटना घडल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता रस्त्यावर पडलेल्या जखमींना स्वतःच्या वाहनामध्ये नेऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले.