हिंगोली - जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून वातावरणात बदल निर्माण झाला आहे. सकाळपासूनच ढगाळ वातावरण असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील सेनगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. त्यामुळे त्या भागातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. तर सोसाट्याचा वाराही सुटल्याने झाकून टाकलेली हळद उघडी पडत असल्याने, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
आधीच कोरोनाने हैराण असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर शनिवारी सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह सेनगाव परिसरात गारांचा पाऊस झाला आहे.
या भागातील सवना, ब्राह्मणवाडा आदी भागात पावसाने हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यामध्ये हळदीचा हंगाम हा जोरात सुरू आहे. हळद काढणीपासून ते शिजवण्यापर्यंत रात्रंदिवस शेतकरी काम करीत आहेत. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. तसेच काही भागात रब्बी हंगामातील गहू, हरभराची देखील काढणी जोरात सुरू आहे. मात्र, पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. ढगाळ वातावरणामुळे लहान बालके तसेच वयोवृध्द व्यक्तींचे आजारी पडण्याचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे.