हिंगोली - जिल्ह्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते, दुपारी तीन नंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. शेतकरी सध्या खरिपाच्या तयारीला लागला आहे. या पावसामुळे शेतीच्या मशागतीला अजून वेग येणार आहे. तर काही भागात पाण्याच्या शोधासाठी होणारी गुरांची आणि वन्य प्राण्यांची भटकंती थांबण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील वातावरणात अचानक दोन दिवसांपासून बदल जाणवत आहे. आज हिंगोली येथे अत्यावश्यक दुकानांसह दारू विक्रीची दुकाने उघडण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार आज खरेदी करण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती. तर सकाळपासून दाटून आलेले ढग बरसतील असा अनेकांना अंदाज होता.
दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. 15 ते 20 मिनिटे शहरात मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात वातावरणात थंडावा निर्माण झाल्याचे जाणवत होते.
पेरण्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेती मशागतीच्या कामांना गती आली आहे. या पावसामुळे अजून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तर खते, बी-बियाणे घेण्यासाठी देखील शेतकरी गर्दी करत असल्याचे पहावयास मिळाले.