हिंगोली - संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची संततधार सुरू असताना हिंगोली जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर, साडेअकरा नंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी पहावयास मिळत आहे. या तीन दिवसांच्या पावसाने खरिप पिके धोक्याबाहेर निघण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात पंधरा दिवसाच्या प्रतीक्षेनंतर दोन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह शनिवारी पावसाचा जोर वाढला. प्रशासनाकडे गेल्या 24 तासात 16. 27 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र, रात्रभर पाऊस सुरूच असल्याने सरासरी वाढली आहे. हिंगोली- 21.96, कळमनुरी 26.27, सेनगाव 24.18, वसमत 12.92, ओंढा नागनाथ 33.37 अशी सरासरी एकूण 23.38 टक्के वर्षाअखेर पाऊस झाल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे. आतापर्यंत मागील वर्षी 49. 30 टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसत आहे.
सलग तिसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने सर्वत्र रस्त्यावर पाणी साचले आहे. तर अकोला-पूर्ण रेल्वे मार्गावरील करांजाळा, धमनी, हिंगोली, नव्हलगव्हान, मालसेलु, कनेरगाव नका येथील रेल्वे पुलाखालीदेखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे.