हिंगोली- रक्षा बंधन हा सण बहीण आणि भावासाठी खूप महत्त्वाचा असतो. बहीण कुठेही असो किंवा भाऊ कुठे ही असो, राखी पौर्णिमेला एकत्र येतात अन बहीण राखी बांधून आपल्या लाडक्या भाऊरायाचे औक्षण करते. मात्र, दिवसरात्र सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या बहिणीकडे येताच येत नाही. म्हणून, हिंगोली येथील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर हे गत वर्षी टाकाऊपासून विद्यार्थ्यांकडून आकर्षक राख्या तयार करून सीमेवरील जवानांसाठी पाठवले होते. यंदा कोरोनामुळे राख्या तिकडे न पाठविता हिंगोली जिल्ह्यातील कोरोना योद्धांना पाठवणार आहेत.
कोरोनाने संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. या महाभयंकर कोरोनाचा प्रत्येकाला फटका बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमी झालेल्या टाळेबंदीमुळे अनेकांचा रोजगार गेला. हा कोरोना आता भाऊ बहिणीच्या राखी पोर्णिमेवर ही सावट ठरत आहे. भाऊरायासाठी जिल्ह्यात सर्वत्र जागोजागी आकर्षक राख्यांचे दुकाने लागतात. यातून लाखोंची उलाढाल देखील होते. मात्र, यंदाच्या कोरोना काळात राखीचा उद्योग दुकाने ठप्प झाली आहेत. ग्राहकांनी राखी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे. ग्राहकांची प्रतीक्षा करत बसण्याची वेळ राखी विक्रेत्यांवर येऊन ठेपली आहे.
कवडी येथील सावित्रीबाई फुले आदिवासी विद्यालयातील कला शिक्षक दिलीप दारव्हेकर हे विद्यार्थ्यांकडून राख्यामध्ये झाडांच्या बिया, पांंढरा धागा यासह अवतीभवती असणारे साहित्य वापरून राख्या बनवून घेतात. त्यानंतर त्या राख्या सीमेवरील जवानांना पाठवतात. मात्र, यंदाही त्यांनी राख्या बनविल्या. मात्र, सीमेवर न पाठवता कोविड योद्ध्यांना राख्या देणार असल्याचे त्यांनी सांगितले.