हिंगोली- शिक्षकीपेशाला काळिमा लावणारी घटना समोर आली आहे. शहरापासून जवळच असलेल्या बळसोंड परिसरात असलेल्या खासगी शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. या प्रकरणी शिक्षकाविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. बाळू फोफसे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याने कोरोनाला हरविण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे.
आरोपी फोफसे हा बळसोड भागातील आनंदनगर भागात 27 जुलैला सायंकाळी चारच्या सुमारास पीडितेच्या घराभोवती पाहून शिट्या मारत घिरट्या घालत होता. ही बाब पीडितेच्या लक्षात येतात ती घाबरून घरात जाऊन बसली. हा शिक्षक तिच्या मागेच घरामध्ये धावून गेला. त्यानंतर आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. अशा प्रकाराने शिक्षकावर कसा विश्वास राहील, असा प्रश्न पालकवर्गातून विचारला जात आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी आटापिटा करणाऱ्या शिक्षक संघटना या आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
घटनेचा तपास ग्रामीण पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक बी. ए कांबळे करत आहेत. दरम्यान, घटनेची अधिक माहिती विचारण्यासाठी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात संपर्क केला असताना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.