हिंगोली - दिवसेंदिवस कोरोनाचे थैमान वाढतच असून कोरोनाला हरवण्यासाठी अनेक दानशूर पुढे आले आहेत. अशातच एका दहा वर्षीय मुलीने आपला वाढदिवस साजरा न करता 25 हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केले. तिच्या या कार्याचे संसद सदस्य राजीव सातव यांनी पत्राद्वारे आभार मानत तिला शुभेच्छा दिल्याचे पत्र फेसबुक अकाऊंट वरून अपलोड केले. शेजल सुनील चेंडके (10)रा. रुपुर ता. कळमनुरी असे या मुलीचे नाव आहे.
![संसद सदस्य राजीव सातव यांनी शेयर केलेले पत्र](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-hin-05-birthay-celibred-vis-7203736_11052020225530_1105f_1589217930_979.jpg)
शेजलचा सोमवारी दहावा वाढदिवस होता. मात्र कोरोनामुळे सर्वत्र विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अनेक दानशुर मदतीसाठी धावून आल्याचे शेजलने पाहिल्याने ती देखील प्रभावीत झाली. तिने स्वतःच्या वाढ साजरा न करण्याचा निर्णय घेत वाढदिवसावर खर्च होणारा पैसा मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचे तिने आई-वडिलांना सांगितले. यावर आई वडिलांनी तिला होकार दर्शविला.
शेजलने जमा केलेले पैसे अन् घरच्यांनी दिलेले काही पैसे असा एकूण 25 हजार रुपयाचा धनादेश तिने कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालाकडे सुपूर्द केला. शेजलच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक झालेच. मात्र, राजीव सातव यांनी या मुलीचे कौतुक करत पत्राद्वारे तिचे आभार मानले. एवढ्या कमी वयात तू दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीबाबत मला मनस्वी आनंद झाला. तुला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा व आशीर्वाद. तू उचललेलं हे पाऊल खरोखरच अतिशय कौतुकास्पद असून सर्वांनाच प्रेरणा देणारं आहे. 'तुझ्या उज्वल भविष्यासाठी खूप शुभेच्छा', असे पत्र सातव यांनी त्यांच्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंट वरून शेअर केले आहे. तर, तिच्या या कार्याचे जिल्ह्यातही कौतुक केले जात आहे.