हिंगोली- संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद करून 'ईव्हीएम हटाव देश बचाव चा' नारा देत निवडणूक विभागाला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच धर्तीवर हिंगोली जिल्ह्यातही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
दिवसभर सुरू असलेल्या या घंटानादामुळे सर्वांच्या नजरा खिळून घेतल्याचे पहावयास मिळाले. या घंटानाद आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दिवसभर घंटानाद सुरू होता. तर ईव्हीएम हटाव देश बचावच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
ईव्हीएममुळे मतदानात घोळ होत असून, कोणतेही यंत्र हॅक करता येते मग मशीन करता येऊ शकत नाही? असा सवाल वंचित बहुजनच्या कार्यकर्त्यांनी सरकारला विचारला. तसेच ज्या देशांमध्ये ईव्हीएम मशीन बनविली गेली त्याठिकाणी या मशीनचा वापरण्यात केलेला नाही. मात्र, त्याच ईव्हीएमचा आधार घेत भाजपने निवडणुक जिंकल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
दिवसभर सुरू असलेल्या घंटानादमुळे जिल्हा कचेरी परिसर चांगलाच दणाणून गेला होता. अशाच ईव्हीएमवर निवडणुका सुरू राहिल्यास तेच ते सरकार सत्तेत येत राहील. यामुळे भारताची लोकशाही धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच ईव्हीएम मशीन हटवून यापुढील निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात ही मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली.