हिंगोली - जिल्ह्यात दिवाळीत आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे अक्षरश: दिवाळे काढले आहे. या अवकाळी पावसामुळे सोयाबीन, ज्वारी आदि खरिपाची पिके हातची गेली आहेत. एवढे होऊनही अद्याप प्रशासन पंचनाम्यासाठी पुढाकार घेत नाही आहे. तर, दुसरीकडे पुढारी देखील फोटोसेशन करत शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत आहेत. असे असले तरीही अजून एकही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर पंचनाम्यासाठी पोहोचलेला नाही. त्यामुळे कंटाळून सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी बांधावर काळे झेंडे लावून प्रशासनाचा निषेध केला आहे.
हिंगोली जिल्ह्यात यावर्षी दिवाळीच्या कालावधीत सर्वाधिक जास्त परतीच्या पावसाने खरीपाची पिके झोडपून काढलीत. दिवाळीच्या कालावधीत शेतकरी शेतीमाल घरी आणून त्याची लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतात. मात्र, यावेळेसच्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना ही संधी दिलीच नाही. पावसाच्या कहराने डोळ्यासमोर सोयाबीन, ज्वारी, कपाशी पूर्ण भिजून सडून गेली. यामुळे शेतकरी हतबल झाला असून प्रशासनाने अद्याप पंचनामे देखील केलेले नाहीत.
हेही वाचा - हिंगोलीतील गाव विक्रीस काढलेल्या शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण
प्रशासनाच्या या दिरंगाईला कंटाळूनच ताकतोडा येथील शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये बांधावर काळे झेंडे लावून प्रशासनाचा निषेध केला आहे. निदान आतातरी प्रशासन पंचनामे करण्यासाठी जागे होते का? याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. याचवर्षी जुलै महिन्यात देखील येथील शेतकऱ्यांनी दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून ताकतोडा गाव विक्रीसाठी काढले होते. संपूर्ण महाराष्ट्रात या गावाची चर्चा झाली होती. आता पुन्हा नुकसानभरपाईसाठी प्रशासन पाठ फिरवत असल्याने या गावातील शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवून प्रशासनाचा निषेध करत ते चर्चेत आले आहेत.
हेही वाचा - हिंगोलीत वाघाने ३ गाई केल्या फस्त, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या आमदारांनी सहानुभूती दाखवत शेतकऱ्याच्या बांधावर धाव घेऊन नुकसानीची पाहणी केली. पाण्यात गेलेल पीक हातात घेऊन त्या त्या तालुक्यातील तहसीलदाराना पंचनामे करण्याचे आदेशही दिलेत. मात्र, प्रशासनाचा अधिकारी, कर्मचाऱयांपैकी अजून कोणीही शेतकऱ्यांच्या बांधावर पंचनामे करण्यासाठी पोहोचलेला नाही. त्यामुळे, आता शेतकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केल्यानंतर तरी प्रशासन जागे होते की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - ऐन भाऊबीजेच्या दिवशी भावा-बहिणीची कायमची ताटातूट; अपघातात भावाचा मृत्यू