हिंगोली - जिल्ह्यात सोयाबीनच्या बोगस बियाण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने कृषी विभागाने पंचनामे करुन संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 2 जुलैला कृषी अधिक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. कृषी अधीक्षकांनी गुन्हे दाखल करण्याचे लिखित आश्वासन आज पाळले आहे. आज संबंधित कंपन्या विरुद्ध सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील हा दुसरा गुन्हा दाखल झाला असून यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे बोगस बियाण्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र, आता नुकसान भरपाईचे काय? या कडे सर्वांचे लक्ष लागलंय.
सोयाबीन कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल तालुका कृषी अधिकारी तथा बियाणे निरीक्षक संदीप वळकुंडे यांच्या फिर्यादीवरून अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड 27 न्यू कॉटन मार्केट लेआऊट नागपूर व्यवस्थापक, तसेच रवींद्र बोरकर या दोघांविरुद्ध तर कृषी विस्तार अधिकारी प्रताप गाडे यांच्या फिर्यादीवरून मे ईगल सीड्स अँड बायोटेक इंदोर व्यवस्थापक व राजकुमार मारुती बाबर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीचे विविध शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे शेतात पेरणी केली होती, मात्र बियाण्याची उगवण झालेली नसल्याने शेतकरी हे चांगलेच हैराण झाले होते. त्यानुसार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. एवढेच नव्हे तर तक्रारीच्या अनुषंगाने बियाणे उगवण न झालेल्या भागांमध्ये प्रशासन स्तरावर कृषी विभागाने पंचनामे करून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवेदने देत, कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. आंदोलन मागे घेण्यासाठी कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी लिखित स्वरूपात गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. आज संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करून कृषी अधीक्षक यांनी आश्वासन पाळल्याचे दिसून आले. एकंदरीतच उगवण क्षमता कमी असताना देखील कंपनीने उगवण क्षमता जास्त असल्याचे दर्शवत शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आता फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हे तर दाखल झाले आहेत. मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे कसे भरून निघणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकसान भरपाई लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष नामदेव पतंगे यांनी केली आहे.