हिंगोली - तालुक्यातील चांगेफळ शिवारातील एका विहिरी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह विद्रुपावस्थेत रविवारी (2 नोव्हेंबर) सापडला होता. त्या मृताची ओळख पटली असून नाव वैभव जयनंद वाठोरे, असे त्याचे नाव आहे. त्याच्या खून त्याच्याच सासऱ्याने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी नरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
आरोपी आहे महसूल विभागात कार्यरत
मधुकर नामदेव लोणकर, असे आरोपीचे नाव आहे. तो तलाठी या पदावर कार्यरत आहे. तर आरोपीच्या मुलीचे आणि मृत वैभव जयनंद वाठोरे याचे प्रेमसंबंध होते. त्या दोघांनी लग्न देखील केले होते. तेव्हापासूनच आरोपीच्या मनात हा मुलीसह जावयाचा राग होता. याच कारणावरुन अनेकदा भांडणे देखील झाली होती.
वाळूचे ट्रॅक्टर पकडायचे आहे म्हणून घेतले होते बोलावून
आरोपी हा जावयाला मारण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत होता. यापूर्वी औरंगाबाद येथे नेऊन जावयाला व्यवसाय सुरू करून देण्याचा ही बहाणा केला होता. मात्र, जावयाने स्पष्ट नकार दिल्याने, ती योजना फसली होती. यावेळी मात्र, आरोपीने फोन करून वाळूचे ट्रॅक्टर पकडण्यासाठी जाण्याचा बहाणा केला. सासऱ्याचा फोन आल्याने जावाई धावूनही गेला. सेनगाव परिसरात नेत जावयाला मारहाण करून हात पाय बांधून विहिरीत टाकले.
मित्राने घेतली होती आरोपीच्या घरी धाव
मृत हा तीन दिवसांपासून गायब असल्याने, मित्रांनी व नातेवाईकांनी बराच शोध घेतला. मात्र, मृताच्या सासऱ्यावर संशय असल्याने, काही मित्राने थेट आरोपीच्या घरी धाव घेऊन, वैभवची विचारपूस केली होती. मात्र, आरोपीने मित्राला उडवाउडवीची उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने लावले होते मुलीचे परस्पर लग्न
आरोपीला मृताचे आणि मुलीचे प्रेम प्रकरण अजिबात मान्य नव्हते. त्यामुळे आरोपीने आपल्या मुलीचे मृत जावयाच्या परस्पर लग्न लावून दिले होते. तेव्हापासून, मृत हा आरोपीच्या घराभोवती चकरा मारत होता. याचा आरोपीला फार राग येत होता. त्यामुळेच मृताला संपविण्याचा कट केला होता.
मुलीलाही संपविण्याचा केला होता प्रयत्न
आरोपीने यापूर्वी स्वतःच्या मुलीलाही संपविण्याचा कट केला होता. मात्र, तो कट फसला आणि तिचे लग्न लावून दिले. तेव्हापासून, मृत हा पत्नीची वारंवार विचारणा करत होता. याचाच राग आरोपीच्या नातेवाइकांना येत होता.
'अशी' पटली मृताची ओळख
प्रेत हे पाण्यामध्ये असल्याने, पाण्याने चेहरा हा पूर्णपणे विद्रुप झाला होता. तर मृताजवळ ओळखीचा कोणताही पुरावा नव्हता. त्यामुळे नरसी पोलिसांनी मृताचा फोटो हा विविध सोशल मीडियावर व्हायरल केला. कपड्यावरून मृताची ओळख पटली आहे.
नरसी पोलिसात गुन्हा दाखल
याप्रकरणी नरसी पोलीस ठाण्यात मृताचे वडील जयचंद काशिनाथ वाठोरे (रा. सिंधेफळ) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मधूकर नामदेव लोणकर याच्या विरोधात नरसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हा फरार असून, पोलीस पथक आरोपींचा शोध घेत आहे.
हेही वाचा - हिंगोलीमध्ये विहिरीत आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; खून असल्याचा संशय