हिंगोली - मागील तीन ते चार वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांचे सत्र जिल्ह्यात वाढले आहे. देशात स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा होत असताना सेनगाव तालुक्यातील सवना येथे एका शेतकऱ्याने मध्यरात्रीच्या सुमारास बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राजाराम नामदेव गाढवे (वय-५३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
स्वातंत्र्य दिवस असल्याने घरातील कुटुंबीय बाहेर आले होते. यावेळी त्यांना राजाराम यांचा मृतदेह घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती सेनगाव पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. यानंतर संबंधित मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हालविण्यात आला. या घटनेने गावात खळबळ उडाली.
शेतकरी गाढवे यांच्या नावावर तीन एकर शेती असून, त्यावर खाजगी कर्ज असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. याप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे सर्व गावावर शोककळा पसरली आहे.