हिंगोली - जिल्ह्यात कळमनुरी, वसमत आणि हिंगोली या तीनही विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार मतदारांच्या भेटी गाठी घेण्यासाठी जीवाचे रान करत आहेत. जिल्ह्यातील डिग्रस कऱ्हाळे येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे महायुतीचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे यांची यांची बोलती बंद झाल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांनी शासनाबाबत नाराजी व्यक्त करायला सुरवात करताच मुटकुळे गोंधळुन गेले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी उमेदवार आपापल्या मतदारसंघातील गावांमध्ये धाव घेत आहेत. हिंगोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार आमदार तानाजी मुटकुळे हे डिग्रस कऱ्हाळे येथे प्रचार सभा घेत होते. दरम्यान, तुम्ही पाच वर्षात शेतकऱ्यांसाठी कोणती कामे केली ते सर्वप्रथम सांगा आणि नंतरच पुढचे बोला, असे एका शेतकऱ्याने मुटकुळे यांना सुनावले. त्यावर काँग्रेसने तरी काय केले हे सर्वप्रथम तुम्ही मला सांगा, असे प्रत्युत्तर दिल्याने शेतकरी पुन्हा भडकले. यावेळी, मुटकुळे आणि गावकऱ्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली. शेवटी मुटकुळे यांनी तिथुन काढता पाय घेतला.
हेही वाचा - रावण दहन करायला जिल्हाधिकाऱ्याने उचलले धनुष्य; आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल
लोकसभा निवडणुकीदरम्यानही मुटकुळे यांच्यासोबत असाच प्रकार घडला होता. सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. सध्या सोयाबीनचे हंगाम जोरात असल्याने मतदार पहाटेच शेतात निघून जात असल्याने उमेदवारांवर गावातील वयोवृद्ध आणि बालकांच्या भेटी घेऊन परतण्याची वेळ येऊन ठेपली आहे.