हिंगोली - जिल्ह्यात शेतकऱ्यांनी विविध कंपनीच्या सोयाबीन बियाणांची पेरणी केली होती. मात्र त्यांची उगवणच झाली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. मात्र कृषी विभागाकडुन पंचनामे करण्यात न आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवारी कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले.
'कर्ज काढायची वेळ आलीय.. त्यामुळे पगाराला कात्री लावण्याची गरज'
यंदा कोरोनामुळे शेतकरी हैराण झाला आहे. पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. मात्र पावसाची संततधार आणि पेरलेल्या सोयाबीनच्या बियाणांची उगवण न झाल्याने, शेतकरी आता आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या, मात्र कृषी विभागाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही तसेच पंचनामेही करण्यात आले नाही. तसेच, संबधित कंपनीवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कृषी अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
काही दिवसांपुर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी खुर्च्या फेकून देत आंदोलन करण्यात केले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कृषी अधीक्षक कार्यालयात आज पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. यादरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी अधिकाऱयांसमोर मांडल्या. मात्र जोपर्यंत संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करणार नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन हे मागे घेणार नसल्याचा पवित्रा यावेळी कार्यकर्त्यांनी घेतला होता. दरम्यान, कृषी अधीक्षक विजय लोखंडे यांनी संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.