हिंगोली - परतीच्या पावसाने ही खरीप शेतीसह फळबागांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. हजारो रुपये खर्च करूनही डाळिंबाच्या झाडांना फळ न लागल्याने सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथील एका शेतकऱ्यांने ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाच एकरातील डाळिबांची झाडे उपटून टाकली आहेत.
सुरेश सावके रा. ताकतोडा असे या शेतकऱ्यांचे नाव आहे. यांनी पाच वर्षांपूर्वी आपल्या पाच एकर शेतीत डाळिंबाची लावगड केली होती. यावर महागाडे औषधी फरावरणी करून, हजारो रुपयांचा खर्च देखील करण्यात आला. शिवाय, डाळिंबाची झाडे लहानाची मोठी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. झाडाची वाढ ही बऱ्यापैकी झाली. मात्र, फळे लागण्याच्या कालावधीमध्ये, परतीच्या पावसाने डाळिंबाची सर्व बाग झोडपून काढल्याने फळे लागली नाहीत. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहायाने पाच एकरातील डाळिंबांची झाडे उपटून टाकली आहेत.
फळ लागल्यानंतर आपल्याला कर्जाच्या डोंगरातून आज ना उद्या बाहेर पडता येईल, या अपेक्षेने काबाड कष्ट केले. मात्र, डाळिंबाच्या झाडाला फळेच लागली नसल्याने, सावके यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.
आर्थिक नियोजन कोलमडले
बागेवर करण्यात आलेला खर्चही न निघाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन हे पूर्णपणे कोलमडले आहे. सावके यांनी मोठ्या अपेक्षेने या फळबागांवर उसनवारी करून खर्च केला होता. मात्र, फळे लागण्याच्या कालावधीमध्ये नुकसान झाल्याने त्यांनी कठोर निर्णय घेतल्याचे सांगितले.
नुकसान भरपाई मिळावे ही अपेक्षा
पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पाऊस फळबागांसाठी धोकादायक बनल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित आहे. त्यामुळे, निदान आता तरी कृषी विभागाने नुकसानीची तपासणी करून भरपाईची मागणी सुरेश सावके यांनी केली आहे.