हिंगोली- सध्या शेतकरी हे जरी निसर्गाच्या अवकृपेने हैराण असले तरीही काही शेतकरी हे गांजाची शेती करण्याचे अजिबात विसरलेले नाहीत. अशाच एका ऊस उत्पादक शेतकऱ्यांने गांजाची लागवड केल्याची गोपनीय माहिती पोलीस प्रशासनाला समजली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली संबधितावर कारवाई करत 345 गांजाची झाडे नष्ट केली. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.
शेतकरी हा निसर्गाच्या अवकृपेने चांगलाच भांबावून गेला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील बऱ्याच गावात शेतकरी हे गांजाच्या शेतीकडे वळल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी आणि आता वसमत या भागात बऱ्याच शेतात गांजाची झाडे पोलिसांच्या कारवाईत आढळून आली आहेत.
गोपनीय महितीच्या आधारे केली कारवाई
वसमत तालुक्यातील हाफसापूर येथे नामदेव सवंडकरने ऊसाच्या शेतात गांजाची लावगड केल्याची गोपनीय माहिती स्थानिक पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी सवंडकर यांच्या शेतावर कारवाई केली. यावेळी ऊसाच्या शेतात गांजाची लावगड केल्याची धक्कादायक बाब समोर आली. यामध्ये लाखो रुपये किंमतीचे 345 गांजाची झाडे जप्त करण्यात आली.
परिसरातील शेतशिवार काढला जातोय पिंजून
पोलिसांच्या पथकाने ऊसाच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केल्यानंतर अजूनही या भागात शेतकरी गांजाची शेती करत आहेत का? याची चाचपणी करण्यासाठी शेतशिवार पिंजून काढले जात आहे. सोबतच या भागातील गांजाची गोपनीय माहिती देखील घेतली जात आहे.
अंतरपीक म्हणून घेतला जात होता गांजा
आतापर्यंत अंतर पीक म्हणून अद्रक, मेथी, कोथंबीर आदी भाजीपाला घेतला जात होता. मात्र, याच शेतकऱ्याला गांजाचे पीक अंतर पीक म्हणून घेण्याची कल्पना नेमकी सुचली कशी, तसेच या पूर्वी ही हा गांजा घेत होता का, तसेच गांजा नेमका विक्री कुठे करत होता. याची संपुर्ण माहिती घेतली जात आहे.