हिंगोली - कोरोनामुळे शेतकरी हा चांगलाच अडचणीत सापडलेला आहे. मनामध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर तुमचे कोणतेही स्वप्न हमखास उतरू शकते. याचे उदाहरण म्हणजे जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा येथील डाळींबउत्पादक शेतकरी, खडकाळ जमिनीत डाळींबाचे उत्पादन घेतोय. शेततळे डाळींबासाठी जीवदान ठरले असून, या पाण्यामुळे शेतकऱ्याचा खडतर प्रवास सुखकर झाल्याची माहिती डाळींब उत्पादक शेतकरी देत आहेत. त्यांच्या या यशस्वी डाळींब बागायती शेतीचा हा विशेष वृत्तात..
पश्चिम महाराष्ट्रातील फळबागा पाहून वायचाळ यांच्या डोक्यातही डाळींब लागवडीचा विचार आला आणि, त्यांनी ते प्रत्यक्षात आणायचे ठरवले. त्यांनी गावाजवळच असलेल्या शेतात प्रयोग म्हणून डाळींबाची लागवड केली. पाण्याच्या नियोजनसाठी त्यांनी शेत तळ्याचा वापर केला. पहिल्या वर्षी अनुभव कमी असल्याने, खर्च जास्त अन उत्पन्न कमी आले. मात्र दुसऱ्या वर्षी खर्च जाऊन एक ते दीड लाख उत्पन्न मिळाले. तिसऱ्यावर्षानंतर त्यांना डाळींब शेतीचा चांगला अनुभव आला होता. तिसऱ्या वर्षीच्या पिकात त्यांना दोन ते अडीच लाखांचा निव्वळ नफा मिळाला. तर या वर्षी जवळपास 11 ते 12 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास वायचाळ यांनी व्यक्त केला आहे. डाळींब पिकातून चांगल्या प्रकारचे आर्थिक उत्पन्न मिळू शकते. फक्त परिश्रम जीवतोड करणे गरजेचे असल्याची माहिती वायचाळ यांनी दिली.
ज्याप्रमाणे आपण आपल्याकडील अधिकची रक्कम ही बँकेत ठेव म्हणून ठेवतो. त्याच प्रमाणे, शेततळ्यातील पाण्याचे आहे. त्यात असलेले पाणी म्हणजे शेतकऱ्यांसाठी बँकेतील ठेवच. जेव्हा आपल्याकडील पैसे संपले की आपण बँकेकडे धाव घेतो. तसेच या पाण्याचे देखील आहे. जेव्हा सर्व साठवण संपते तेव्हा हे पाणी आपल्यासाठी खुप उपयोगी पडत असल्याचे शेतकरी वायचाळ यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या योजनांसह शेततळ्याचा देखील उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले. तसेच बागायती शेतीसाठी कृषी सहायकांचेदेखील वेळोवेळी मार्गदर्शन घेतले तर निश्चितच आपली शेती फुलून आपल्याला आर्थिक उत्पन्न देणारी ठरत असल्याचीही प्रतिक्रिया वायचळ यांनी दिली.