हिंगोली- जिल्ह्यामध्ये काही केल्या शेतकरी आत्महत्येच्या घटना कमी झाल्या नाही. आता तर चक्क माहेरी आलेल्या लेकीची बोळवण करण्यासाठीही पैसे नसलेल्या हतबल अल्पभूधारक शेतकऱ्याने धरणात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
प्रेमदास रंगनाथ राठोड (वय.४५, रा. लिंबाळा तांडा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे अर्धा एकर शेती आहे आणि त्यांच्या नावावर सेनगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ७४ हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र, सततची नापीकी त्यातच मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे राठोड यांच्या शेतातील पीक पूर्णपणे नाहीसे झाले. त्यामुळे शेतात काहीही उत्पन्न झाले नाही. बँकेचा जाच आणि अशातच मुलगी माहेरी परत आली. तिची बोळवण करायची होती. त्यासाठी राठोड यांनी अनेकांकडे उसणे पैसेही मागण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे, शेतकरी राठोड हतबल झाले होते. याबाबत त्यांनी कुटुंबियांशीही चर्चा केली होती. मात्र, राठोड यांनी आज येलदरी धरणात उडी घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी संतोष राठोड यांच्या माहितीवरून सेनगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.