हिंगोली - कर्जबाजारी शेतकऱ्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली. ही घटना आज दुपारी वसमत येथे घडली. सदाशिव मारोती होळपादे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
मागील तीन ते चार वर्षापासून जिल्ह्यात अत्यल्प पर्जन्यमान असल्यामुळे शेतीचे उत्पादन कमी होत आहे. अशा परिस्थितीत डोक्यावरील कर्ज कसे फेडायचे या चिंतेत सदाशिव होळपादे होते. त्यांच्याकडे सव्वा एकर शेती असून त्यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे 30 हजार रुपयांचे कर्ज आहे. मात्र नापिकीमुळे ते कर्ज फेडायचे कसे ? याची चिंता त्यांना भेडसावत होती. ते नेहमीच कर्जफेडीच्या चिंतेत राहत असत. आज त्यांनी अकोला ते पूर्णा रेल्वे महामार्गावरील वसमत येथे रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात आत्महत्याचे सत्र कमी होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. याप्रकरणी बबन मारोतराव होळपादे यांच्या तक्रारीवरून वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.