हिंगोली - "मागील वर्षीपासून जरा जास्तच निसर्ग कोपलाय यामध्ये शेतीच प्रचंड नुकसान होत आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी अनेक मंत्री येतात. शेतात झालेल्या चिखलात उभे राहतात आणि मदत मिळवून देण्याचे कोरडे आश्वासन देऊन निघून जातात. आतापर्यंत कोणत्याही सरकारकडून काही मिळालं का? मग आताचं सरकार काय करणार आहे? त्यामुळे आम्ही आशाच सोडून दिल्याची खंत हिंगोलीतल्या एका शेतकऱ्याने व्यक्त केली.
गुलाब डोखळे रा. रिधोरा, असे शेतकऱ्याच नाव आहे. डोखळे यांच्याकडे रस्त्यालगत 25 एकर शेती आहे. मात्र यावर्षी पावसामुळे शेतातील सर्वच पिके हातातून निघून गेली. सुरुवातीपासून पावसाचा जोर कायम असल्याने आता या उत्पन्नातून भांडवल खर्चही निघतो की नाही, याची चिंता असल्याचे डोखळे सांगतात. एकदा पाहणी करून गेले की परत काहीच नाही. त्यांच्या पाहणीनंतर साधे पंचनामेही होत नसतील तर याहून किती दुर्दैवाची बाब आहे, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली.
डोखळे सांगतात, "सहा एकरमध्ये कपाशीची लागवड केलेली आहे. मात्र परतीच्या पावसामुळे कपाशीची पहिली देखील वेचणी करता आलेली नाही. एक एकर साठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. निसर्गाने साथ दिली तर, कसा-बसा खर्च निघतो. मात्र येथे तर सहा एकर मधील कपाशी पूर्णपणे हातची गेली आहे. त्यामुळे माझं पांढरं सोनं या नेहमीच्या पावसाने काळवंडलेल आहे. तर सोयाबीन व इतर पिके हातची गेली," त्यामुळे हा हंगाम देखील माझा नुकसानाचाच ठरल्याची भावना शेतकऱ्याने व्यक्त केली.
"गेल्या दोन वर्षापासून हीच परिस्थिती उद्भवलेली आहे. मंत्री येतात पाहणी करतात मात्र त्यांच्या पाहणी नंतरही प्रशासन स्तरावर साधे नुकसानाचे पंचनामे देखील होत नाहीत. ही किती खेदजनक बाब आहे. त्यामुळे कोणतेही सरकार शेतकर्यांचे मायबाप होऊ शकत नाही. आम्ही सरकारला मायबाप म्हणून-म्हणून कंटाळलो आहोत. हे यांच्या औपचारिकता पूर्ण करतात शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होत नाही," अशी खंत डोखळे यांनी व्यक्त केली आहे.