हिंगोली - जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकेच्या पोट निवडणुका आज पार पडणार आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या येहळेगाव तुकाराम या गटात एका पदासाठी. ओंढा नागनाथ तालुक्यात आसोला गणात पंचायत समिती सदस्य पदासाठी, तर हिंगोली नगर पालिकेतील वार्ड क्रमांक बारा मध्ये नगर सेवक पदासाठी आज पोट निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्याना शनिवारी मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव गटात १७ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक रिंगणात काँग्रेसकडून शिवानंदा खुडे, भाजप कडून जनाबाई माहोरे, सेनेकडून छायाबाई शेळके, प्रियंका कुरुडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. ११ गावातील १५ हजार मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. पूर्वी काँग्रेसकडे असलेली जागा आपल्याकडे खेचण्यासाठी विविध पक्षांकडून अतोनात प्रयत्न केले जात आहेत. आता निकाला नंतर मतदाराने कुणाला कौल दिला हे कळणार आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील असोला गणात ९ मतदान केंद्रावर पार पडणार्या पोटनिवडणुकीत ९ गावातून ६ हजार ९०२ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवसेकडून माया अविनाश कर्हाळे, तर राष्ट्रवादी कडून कल्पना भागवत पाणबुडे हे निवडणूक रिंगणात आहेत.
नगर पालिकेच्या ११,ब प्रभागातील एका नगरसेविकेने राजीनामा दिल्याने या एक मेव पदासाठी ही पोटनिवडणुकीची प्रक्रिया राबवली जात आहे. निवडणूक रिंगणात शिवसेनेकडून सविता जयस्वाल, तर राष्ट्रवादीकडून आश्विनी बांगर अन सादेका बी रफिक बागवान अपक्ष निवडणूक लढवत आहेत. निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्याना शनिवारी शेवटचे मतदान यंत्र प्रशिक्षण दिले आहे. मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना झाले आहेत. एकूण चार मतदान केंद्रावरून निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ४ हजार ८९९ एवढे मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याचे, निवडणूक निर्णय अधिकारी अतुल चोरमारे अन सीओ रामदास पाटील यांनी सांगितले. मतदान केंद्रावरील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.