हिंगोली - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर अचानकपणे हिंगोली दौऱ्यावर आल्यामुळे शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. मात्र, आयुक्त दौऱ्यासाठी निघाले तेव्हा त्यांच्या बोलण्याचा अंदाज काढून कोणत्या विभागाकडे ते निघालेत यावरून त्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना इशाऱ्याद्वारे कळविले जात असल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे आयुक्तांच्या दौर्यात सर्वकाही 'इशारो इशारो में' या हिंदी गीताची आठवण होत होती.
आयुक्त केंद्रेकरांच्या हिंगोली दौऱ्याने शासकीय यंत्रणेची धांदल, सर्वकाही 'इशारो इशारो में' विभागीय आयुक्त केंद्रेकर हे आज अचानकपणे हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांचा दौरा निश्चित नसल्याने ते कुठे जाणार होते, काय पाहणी करणार होते, याचा प्रशासनाला जराही ताळमेळ नव्हता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धांदल उडाल्याचे पाहावयास मिळाले. आयुक्त केंद्रेकर हिंगोली येथे आल्यानंतर ते बराच वेळ जिल्हाधिकारी यांच्या दालनात बसले होते. त्यानंतर ते दौऱ्यासाठी बाहेर निघाले असता, शासकीय अधिकारी एकमेकांच्या तोंडाकडे बघत होते. नेमके साहेब जाणार आहेत तरी कुठे? याचा कुणालाही अंदाज नव्हता. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा अंदाज घेत ते त्या विभागाकडे जाणार असल्याचे समजताच, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जवळ बोलावून साहेब तुमच्याकडे येत असल्याचे इशारे करून सांगितले जात होते. त्यानंतर संबंधित अधिकारी हे आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना माहिती देत आयुक्त आपल्या विभागाला भेट देणार असल्याचे सांगून पुढील तयारीला लागले होते.
आयुक्त दौऱ्यासाठी गाडीत चढताना दोन ते तीन शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे निवेदन घेऊन धाव घेतली. त्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकारी यांना या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या. पुढे आयुक्तांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना वार्डला भेट दिली. एकंदरीतच दौरा अचानक ठरल्याने अधिकारी मात्र एकमेकांना इशाऱ्याद्वारे कळवत असल्याने 'ईशारो ईशारो में' या हिंदी गीताची आठवण होत होती.