हिंगोली - काय गाढवासारखा वागतोस गाढव आहेस का? कामांमध्ये थोडी जरी चूक झाली तर गाढवाच्या नावाच्या उपमा या अनेकदा ऐकाव्या लागतात. मात्र, आता हेच गाढव लहान बालकांसह वयोवृद्ध मंडळींसाठी देव बनल आहे. हिंगोली येथे परजिल्ह्यातून गाढव घेऊन दाखल झालेली मंडळी गल्लोगल्ली दुधाळ गाढव घेऊन फिरत दूध विक्री करून, शरीरातील सर्वच रोग दूर होत असल्याचे सांगत सुटली आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून हिंगोलीत मात्र गाढविणीच्या दुधाची चर्चा जोरात सुरू आहे. तर एक चमचा दुधासाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गाढविणीच्या दुधाची विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे काही क्षणात परजिल्ह्यातून दाखल झालेल्यांना हाकलून दिले आहे.
काय आहे प्रकरण -
हिंगोली शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये मागील काही दिवसांपासून पहाटे चारच्या सुमारास 'दूध घ्या दूध, गाढविणीचे दूध' सर्व गुण असलेले हे दूध शरीरातील सर्वच आजारावर उपयुक्त आहे. असे सांगत गल्लीबोळातून आरोळी ठोकून गाढविणीच्या दुधाची विक्री करणाऱ्या टोळ्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या. ते गाढविणीचे दूध लहानांसह व युवकांच्या शरीरासाठी कितपत उपयुक्त आहे, हे पटवून देऊन दूध विक्री करत होते. जवळपास चमचाभर दुधासाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागत असत. सध्या कोरोना परिस्थिती असल्याने प्रत्येक जण घाबरलेल्या स्थितीत आहेत. कोरोना काळामध्ये आरोग्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण सजग झाले आहेत. एवढेच नव्हे, तर या कालावधीत होमिओपॅथी औषधे आणि आयुर्वेदिक गोळ्यांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री वाढली होती. त्याच प्रमाणे हे दूध देखील गुणकारी असेल असे समजून बरेच जण त्या दुधाची विक्री करीत होते. एवढेच काय तर कोरोनापासून देखील हे दूध बचाव करू शकते, असा दावा दूध विक्रेत्यांकडून केला जाऊ लागल्याने दुधाला प्रचंड मागणी होऊ लागली. सध्या तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने, एक कप दूध 200 ते 300 रुपये मोजावे लागत होते.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला पर्दाफाश -
हिंगोली शहरातील गल्लीबोळामध्ये गाढविणीच्या दुधाची विक्री होत असल्याची माहिती मिळताच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मगरे यांनी त्या दूध विक्रेत्याचा शोध घेतला आणि या दुधाविषयी सखोल माहिती घेतली. मात्र, या दुधात असे काही ही नसल्याचे अध्यक्ष मगरे यांनी सांगितले. या दूध विक्रेत्याच्या आमिषाला अजिबात बळी न पडण्याचे आवाहनदेखील मगरे यांनी केले आहे. तर या दूध विक्रेत्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिसांनी परत जिल्ह्यातून गाढव घेऊन दाखल झालेल्या सर्वांनाच हिंगोली शहरातून हाकलून दिल्याची माहिती अध्यक्ष मगरे यांनी दिली आहे.
गाढविणीच्या नव्हे, तर इतरही प्राण्यांच्या दुधातून मिळते प्रोटीन -
कोणत्याही प्राण्याचे दूध हे मानवी शरीराला प्रोटीन देणारे असते. गाढविणीच्या दुधामध्ये असे वेगळे काही नसते. त्यामुळे सध्या गाढविणीच्या दुधाचे महत्त्व पटवून देत नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. ही संपूर्ण अंधश्रद्धा असून याला कुठेही महत्त्व नाही. कोणत्याही प्राण्याच्या दुधातून मानवी शरीराला प्रोटीन मिळत असते. त्यामुळे गाढविणीच्या दुधाच्या नावावर नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन पोटविकार तज्ञ डॉ. विठ्ठल रोडगे यांनी केले आहे.
हेही वाचा - Sharad Pawar Birthday - 'शरद पवार' हे देशाच्या राजकारणातील केंद्रस्थानी असणार एक नाव!