हिंगोली - शहरातील आनंद नगर भागात दहशदवादविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात बनावट नोटांचे कनेक्शन विदर्भात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण या नोटांचा वापर राजकीय मंडळींनी निवडणुकीत केल्याचेही आता पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यानुसार पोलीस विदर्भासह मराठवाड्यातील अनेक राजकीय मंडळींच्या शोधात असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या राजकीय नेत्यांचा सहभाग आहे? हे पोलिसांच्या तपासात उघड होणार आहे.
हिंगोली शहरापासून काही अंतरावर असलेल्या आनंद नगर भागातील नोटांच्या कारखान्यातील नोटांनी खूप लांबचा पल्ला गाठल्याचे पोलिसांच्या तपासात उघड होत आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत. पहिल्या दिवशी छापा टाकला तेव्हा बनावट नोटा, 20 हजार खऱ्या नोटांसह प्रिंटर मशीन व सुगंधी मसाला आढळून आला होता. त्यामुळे येथे केवळ नोटांचाच नव्हे, तर गुटख्याचादेखील व्यवसाय सुरू असल्याची शंका होती. त्यामुळे पहिल्या दिवशी पोलीस प्रशासनाने गुटख्याची कारवाई उघड केली नव्हती. मात्र, तपास सुरूच ठेवला होता. दुसरीकडे मुख्य आरोपी असलेल्या संतोष सूर्यवंशी (देशमुख) यास पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर गुटखा लपवून ठेवल्याचे ठिकाण त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तो गुटखा जप्त केला.
आता या बनावट नोटांचा लोकसभा, विधानसभा एवढेच नव्हे तर, ग्रामपंचायत निवडणुकातही उपयोग होत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. त्यामुळे हा कारखाना एक-दोन महिने नव्हे तर, काही वर्षांपासून सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निवडणुकांतून या नकली नोटा किती प्रमाणात चलनात आल्या असाव्यात याचा काही अंदाज नाही. मात्र, पोलिसांच्या तपासात नवनवीन माहिती उघड होत असल्याने, पोलीस त्या-त्या दिशेने तपास करीत आहेत.
मुख्य म्हणजे, या नोटा मराठवाडा आणि विदर्भातील काही राजकीय मंडळींनी चलनात आणल्याने आता अनेक राजकीय मंडळी पोलिसांच्या रडारवर आहेत, तर पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी सांगितले.