हिंगोली - पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी भटकंती करावी लागत असल्याने पालावर आयुष्य जगणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याची कल्पना असून देखील नाईलाजास्तव लेकरांचा विचार न करता संसाराचा गाडा हाकत असल्याची खंत पालावर वास्तव्य करत असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - बालदिन विशेष : उपेक्षित समाजातील बालके अजूनही विकासापासून दूरच....
आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून वाट्टेल ती फी भरण्याची काही पालकांची तयारी असते. मात्र रोजगारासाठी गावोगाव फिरणाऱ्या भटक्या जमातीतील पालकांच्या मुलांना अजून शाळेचे दारही दिसलेले नाही. आपली मुले शाळेत जात नसल्याची खंत त्यांच्या मनातही आहे. मात्र, परिस्थितीपुढे ते हतबल आहेत. गावोगावी भटकून करण्याचा पारंपरिक व्यवसाय हे एकमेव उत्पन्नाचे साधन असल्याने मुलांच्या शिक्षणाचा विचारही मनात आणावासा वाटत नसल्याचे सय्यद सलीम सांगतात. कधी-कधी उपाशी दिवस काढावे लागतात. अशामध्ये काय खावे आणि मुलांच्या शिक्षणावर काय खर्च करावा, हा गंभीर प्रश्न या सर्वांसमोर उभा ठाकतो. अनेक योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.